'हा' प्रवास होणार अवघ्या 10 मिनीटांचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 मार्च 2020

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) भाईंदर पश्‍चिमेकडून वसई पश्‍चिमेला जोडणाऱ्या सहापदरी पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) भाईंदर पश्‍चिमेकडून वसई पश्‍चिमेला जोडणाऱ्या सहापदरी पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. सुमारे ११०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे एमएमआरडीएने जाहीर केले. या कामामुळे वसई ते भाईंदर अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येईल. दरम्यान, पुलाच्या कामाला विलंब झाल्याने निर्मितीचा खर्च ४०० कोटी रुपयांनी वाढला आहे. 

सध्या पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून वसईला जाण्यासाठी वाहनचालकांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पश्‍चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाईंदरपासून वसईला जोडणारा नवा पूल बांधण्यात येईल. एमएमआरडीएने २०१३ मध्ये या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती.

त्या वेळी या प्रकल्पाचा खर्च ११०० कोटी रुपये होता. परंतु, विविध कारणांमुळे कामाच्या निविदा निघत नव्हत्या. हा पूल विस्तारित मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाचा (एमयूटीपी) एक भाग असेल. या सहापदरी पुलाची रुंदी ३०.६० मीटर आणि लांबी ४.९८ किलोमीटर असेल. अंदाजे १५०१.१६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.

 ही बातमी वाचा ः सीएसएमटी स्थानकाला फाईव्हस्टारचा दर्जा
पश्‍चिम रेल्वेमार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेले असले, तरी वाहन घेऊन मुंबईला जाण्यासाठी पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून खाडीला वळसा घालावा लागतो. भाईंदरला जाण्यासाठीही काशिमिरा येथून महामार्गावरून प्रवास करावा लागतो. वसईहून भाईंदरला रेल्वेने जाण्यासाठी केवळ १० मिनिटे आणि महामार्गावरून जाण्यासाठी एक तास ते दीड तास लागतो.

पूल असा जोडणार
नायगावला या पुलाला उतार मिळाल्यानंतर तो रिंगरूटला जोडला जाईल. तेथून तो वसईमार्गे विरारमधील नारिंगीपर्यंत जोडला जाणार आहे. नारिंगी ते पालघर तालुक्‍यातील दातिवरे या खाडीवरील पुलाला मंजुरी मिळाली असल्याने तेथील नागरिकांसाठीही या मार्गाने मुंबई खूप जवळ येईल. भाईंदरला हा पूल नेताजी सुभाषचंद्र मार्गाला जोडून पुढे दहिसरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे वसईहून वाहनाने निघालेली व्यक्ती थेट भाईंदरला १० मिनिटांत आणि तेथून पुढे मुंबईला जाऊ शकेल.

खाडीवरील पूल
विस्तारित मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाचा (एमयूटीपी) भाग.
सहापदरी, ३०.६० मीटर रुंदी; ४.९८ किलोमीटर लांबी.
अंदाजे खर्च ११०० कोटींवरून १५०१.१५ कोटी रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a six-laning bridge on Vasai-Bhayandar route, it will take about 10 minutes There will be a six-laning bridge on Vasai-Bhayandar route, it will take about 10 minutes