esakal | 'त्यांनी' वाचवले 65 जणांचे प्राण 
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त अशोककुमार रणखांब

भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गैबीनगर-पिराणीपाडा येथे असलेल्या एका इमारतीच्या पिलरला तडे गेल्याचे कळताच पालिका आयुक्त आपल्या सर्व सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

'त्यांनी' वाचवले 65 जणांचे प्राण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : वेळ रात्री पावणेदहाची.. "साहेब" भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गैबीनगर-पिराणीपाडा येथे असलेल्या एका इमारतीच्या पिलरला तडे गेले आहेत. इमारतीत राहणारे नागरिक घरातून बाहेर पडण्यास तयार नाहीत, अशी माहिती भिवंडी पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अशोककुमार रणखांब यांना मोबाईलवर देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत 65 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. 

या वेळी, सुरुवातीला नागरिकांनी इमारतीतून बाहेर पडण्यास विरोध केला; मात्र आयुक्तांनी रुद्रावतार घेत त्याना इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे, याची जाणीव करून दिली. त्यानंतर रात्री पावणेबाराच्या सुमारास महिला, मुले व नागरिक अशा 65 नागरिकांना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ममता डिसोझा व पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील सामानासह बाहेर आणले. 

दरम्यान त्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था पालिकेच्या शाळा व सभागृहात केली. तसेच पालिकेचा कर्मचारी अधिकारी यांना या इमारतीत कोणालाही पुन्हा प्रवेश देऊ नका, अशा सूचना दिल्या. त्यानंतर रात्री 12.40 वाजता आयुक्त घटनास्थळावरून परतले. त्या वेळी आपत्कालीन विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे त्यांनी आदेश दिले.

दरम्यान मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास आपत्कालीन विभागाचे अधिकारी ईश्वर आडेप यांनी आयुक्तांना इमारत कोसळल्याची माहिती दिली. या वेळी आयुक्तांनी पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे व पोलिस निरीक्षक डिसोझा यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी आले व मदतकार्य सुरू केले. या वेळी अग्निशमन दलाचे जवान, आपत्कालीन विभाग कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनीदेखील या वेळी मदत कार्यात भाग घेतला. 


काळ आला होता, पण... 

आयुक्त रणखांब समयसूचकतेमुळे भिवंडी मनपाच्या कित्येक कर्मचाऱ्यांचे प्राण वाचून त्यांना जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनाप्रणीत अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन युनियन व कर्मचारी तुमची ऋणी आहे, असे मत व्यक्त केले. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सतर्क केले नसते, तर आज मृतांमध्ये काही कर्मचारीही असते. कर्मचाऱ्यांचा काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. 

आयुक्त रणखांब यांनी एक तासापूर्वी जर इमारतीमधील 17 कुटुंबातील 65 रहिवाशांना इमारतीबाहेर काढले नसते, तर भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. महिलांसह नागरिकांना प्राण गमवावे लागले असते. तसेच इमारतीखाली बसलेले कर्मचारीसुद्धा गेले असते. 
- अहमद वसीम शेख 

 
 

loading image
go to top