‘थर्टी फर्स्ट’साठी पर्यटकांची ईशान्येला पसंती

Sikkim
Sikkim

मुंबई - यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांनी ईशान्य भारताला पसंती दिली आहे. ‘सप्त भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये आणि सिक्कीम येथील हॉटेलांचे बुकिंग २५ डिसेंबरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘फुल्ल’ झाले आहे. त्याचप्रमाणे थंडीतील काश्‍मीर अनुभवण्याकडेही पर्यटकांचा ओढा दिसतो. शहराबाहेर जाऊन ‘थर्टी फर्स्ट’ साजरे करण्याचा ‘ट्रेंड’ जोरात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. 

मुंबईतील धकाधकीच्या जीवनातून विसाव्याचे क्षण मिळावेत म्हणून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक कुटुंबे पर्यटनस्थळांची वाट धरतात. या वर्षी मुंबईकरांनी ईशान्येकडील ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा यांच्यासह सिक्कीमला सर्वाधिक पसंती दिली आहे, असे ‘केसरी टूर्स’चे संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. त्या ठिकाणी निवास-प्रवासाची चांगली व्यवस्था आणि उत्तम हवामान असल्याने पर्यटकांचा ओढा वाढत आहे, असे ते म्हणाले. 

गोवा, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश ही नवीन वर्ष साजरी करण्याची सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत. थंडीत काश्‍मीर कसे दिसते, हे पाहण्याची पर्यटकांची उत्सुकता वाढत आहे. त्यामुळे या वर्षी ‘विंटर काश्‍मीर’ अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे, अशी माहिती कंट्रीसाईड ॲडव्हेंचर हॉलिडेजच्या अक्षता कुलकर्णी यांनी दिली. 

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य, तारकर्ली, गणपतीपुळे, महाबळेश्‍वर या ठिकाणांना पसंती दिली आहे. या ठिकाणी हॉटेलांचे १०० टक्के बुकिंग झाले आहे, असे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी सांगितले.

मुंबईच्या ‘फास्ट लाइफ’मधून निवांतपणा मिळवण्यासाठी मी मोठ्या सुटीत बाहेरगावी जाणे पसंत करते. मुंबईत ३१ डिसेंबरलाही सगळीकडेच गर्दी असते. गोंगाटापेक्षा शांत ठिकाणी राहून नववर्ष साजरे करायला आवडते.
- अक्षता मेश्राम, डोंबिवली

विमानांची तिकिटे आणि हॉटेल बुकिंगवर २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान मोठ्या सवलती मिळतात. त्याचा लाभ घेत कित्येक वर्षांपासून मी ‘थर्टी फर्स्ट’ मुंबईबाहेरच साजरा करतो. मागील वर्षी केरळला गेलो होतो.  
- नीतेश राव, गोरेगाव

मुंबईतील गर्दी नकोशी होते. मद्यपींच्या धिंगाण्यामुळे येथे नवीन वर्षाचे स्वागत करायला आवडत नाही. त्यामुळे मी अलिबाग, गणपतीपुळे अशा ठिकाणी कुटुंबीयांसोबत ३१ डिसेंबर साजरा करते.
- सुप्रिया मानजी, चेंबूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com