'त्या' 50 हजार नागरिकांचं होणार स्क्रीनिंग, महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

'त्या' 50 हजार नागरिकांचं होणार स्क्रीनिंग, महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

मुंबई- बुधवारी कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे हे वादळ धडकलं. कोकण किनारपट्टीहून हे चक्रीवादळ मुंबईत येऊन धडकणार होतं. मात्र मुंबईत पोहोचण्याआधी वादळानं दिशा बदलली आणि त्याचा वेगही मंदावला. त्यामुळे मुंबईवरील मोठं संकट टळलं. मात्र या चक्रीवादळाच्या  पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी 50 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज होत्या. मात्र आता या सर्व स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची स्क्रीनिंग करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. 

स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना दोन दिवस म्हणजे 5 जूनपर्यंत निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांनी आरोग्य तपासणी करुनच त्यांनी घरी सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. जीवित हानी टाळण्यासाठी 50 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
त्यापैकी जवळजवळ 30 हजार लोकं आपापल्या नातेवाईकांच्या घरी गेले. या नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं. मुंबई महापालिकेनं सुमारे 35 शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली.  माहीम पथ्थरवाडीमधल्या 250 लोकांना कॉज वे येथील महापालिका शाळेत हलवण्यात आलं.  

चक्रीवादळाचा धोका टळला असला, तरी या नागरिकांना त्वरित घरी पाठवणे सध्याच्‍या कोरोना व्हायरससारख्या संकटाच्या काळात योग्य नसल्यानं पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रशासनाला या नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश दिलेत. काही नागरिक आपल्या नातेवाईकांच्या घरी असल्यानं घराघरात जाऊन सर्वेक्षण करावं लागणार असून संसर्गाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी अधिक तपासणीसाठी आरोग्य केंद्र वाढवावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 
 
के वेस्ट प्रभागातील सहाय्यक आयुक्त विश्वास मोते म्हणाले, आम्ही देहूची वाडी, सागर कुटीर आणि मोरा गाव येथून जुहू आणि वर्सोवामधील 450 लोकांना रुतुंबरा महाविद्यालय आणि जवळील महापालिकेच्या शाळांमध्ये हलवलं. लहान कंटेन्मेंट झोन असल्यामुळे या भागात बरीच कोरोना पॉझिटिव्ह प्रकरण समोर आली आहेत. 

दोन भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पाटीलवाडीतील 32 जण आणि गणपत पाटील नगरमधील 70 जणांना नगरपालिका शाळांमध्ये हलविण्यात आले. त्याशिवाय पाटीलवाडीतील सुमारे 225 जणांना आणि गणपत पाटील नगरमधील 230 रहिवाशीही सखल भागात राहत असल्यानं घरातून बाहेर पडले. स्थलांतरित झालेल्या सर्वांची कोविड -19ची चाचणी केली जाणार असल्याचं आर उत्तर (दहिसर) च्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितलं आहे.

आयुक्तांनी दिले आदेश 

विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने सर्व स्थलांतरितांचे स्क्रीनिंग करणे आवश्यक असल्याचं चहल यांनी म्हटलं आहे. ज्या नागरिकांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळतील, त्यांना कोरोना काळजी केंद्र 2 मध्ये दाखल करण्यात येईल. तसंच ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नसतील, त्यांना तपासणीअंती दोन दिवसांनी म्हणजे 5 जूनला घरी पाठवावे, असे आदेश आयुक्तांनी दिलेत. तर  वैद्यकीय पथकांनी प्रत्येक स्थलांतरिताची तपासणी केल्याचे प्रमाणित करणे आवश्यक असून या सर्व कार्यवाहीमध्ये विभाग कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी समन्वय साधावा, असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com