नवी मुंबईतील उद्योजक का हताश आहेत? 

नवी मुंबईतील उद्योजक का हताश आहेत? 

वाशी : आशिया खंडातील सर्वांत मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातून (एमआयडीसी) कोरोना संकटानंतर लाखो कामगार त्यांच्या मूळ गावांकडे निघाले आहेत. त्यामुळे ही नगरी मोठ्या संकटात सापडली आहे. या क्षेत्रात सुमारे पाच लाख कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी 70 ते 80 टक्के कामगार हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे उद्योजक, कारखानदारांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. 

नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांसह लहानमोठे असे सुमारे चार हजार 500 उद्योग आहेत. लाकडाऊन जाहीर झाल्यापासून या औद्योगिक पट्ट्यातील सुमारे दोन लाख कामगारांनी शहर सोडून मूळ गावचा रस्ता धरला आहे; तर हजारोंच्या संख्येने मूळ गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पोलिस ठाण्यांसमोर रांगा लावत आहेत. ते पुन्हा कामावर येतील किंवा नाही याविषयी साशंकता आहे. त्यामुळे या काळात उद्योगनगरवर कामगार टंचाईचे संकट येऊ शकते, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर सरकारकडे ठोस धोरण नसून कामगार कायदे हेच कामगार हिताविरोधात असल्याची कामगार नेत्यांची तक्रार आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत उद्योगनगरीची वाटचाल सुरू असताना कामगार, रोजंदारीवरील मजूर हे शहरातून निघून जात आहेत हे चिंताजनक आहे, असे मतही त्यांचे आहे. 

हे वाचा : मुंबईच्या आरोग्यावर आता नवे संकट 
लाकडाऊनमुळे लाखो कामगारांनी त्यांच्या मूळ गावाची वाट धरली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लाकडाऊन संपल्यानंतर कामगार आणायचे कुठून, अशी नवीच समस्या उद्‌भवू शकते. त्यासाठी औद्योगिक पट्ट्यात विश्‍वासार्ह वातावरण तयार होण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात. 

एमआयडीसीवर दृष्टिक्षेप 
नवी मुंबई औद्योगिक क्षेत्र स्थापना : 1960 
औद्योगिक क्षेत्रात विभाग : कळवा, रबाळे, महापे, तुर्भे, नेरूळ 
क्षेत्रफळ : 109.59 चौरस किलोमीटर 
कंपन्या : 4500 
कामगार संख्या : 5 लाख 


लॉकडाऊनच्या काळात उद्योगक्षेत्र टिकवण्यासाठी सरकारने बळ दिले पाहिजे. अनेक बाबी या सरकारच्या धोरणावर अवलंबून आहेत. कंपनी चालक, संघटना आणि सरकारने एकत्र येऊन कृती आराखडा करावा. सद्यपरिस्थितीत गावाकडे गेलेले कामगार शहरात पुन्हा येतील की नाही याविषयी खात्री नाही. 
- के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज 

पंरप्रातीय कामगार त्यांच्या मूळ गावी गेल्यास महाराष्ट्रातील बेरोजगारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. परप्रांतीय कामगार हा कमी वेतनामध्ये काम करण्यास तयार होतो; मात्र येथील स्थानिक रहिवाशांना जादा पैसे द्यावे लागत आहेत. कंपनी चालकांनी जादा पैसे दिल्यास त्यांना उत्तम अशा प्रतीचे कामगार मिळून त्याचा दर्जा सुधारेल. त्यामुळे कंपन्या पुन्हा उभ्या राहतील. 
- राजन राजे, कामगार नेते 
.... 

 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com