esakal | रायगडमध्ये तीन गोविंदांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रायगडमध्ये तीन गोविंदांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सव शनिवारी उत्साहात साजरा होत असताना म्हसळा, तळा, खालापूर तालुक्‍यांतील तीन गोविंदांचा मृत्यू झाल्याने दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. त्यातील दोघांचा हंडीवरून पडून; तर एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दिवसभरात अनेक जण जखमी झाले.

म्हसळा तालुक्‍यातीत खरसई गावातील अर्जुन लक्ष्मण खोत (24) या गोविंदाचा पाचव्या थरावरून (अंदाजे 30 फुटावरून) पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तो श्री समर्थ रामदास सेवा मंडळाच्या गोविंदा पथकातील कार्यकर्ता होता. अर्जुनच्या मृत्यूने संपूर्ण खरसई गावावर शोककळा पसरली आहे. वर्षापूर्वी किशोर खोत या गोविंदाचा याच ठिकाणी हनुमान मंदिरासमोर दुर्दैवी मृत्यू झाला होता.

तालुक्‍यात या वेळी अनंत कोबनाक (केलटे), रूपेश साळुंखे (म्हसळा), पांडुरंग बाळाराम पाटील (खरसई), श्रीपत धोंडू चाळके (कोळे), रवी म्हात्रे (तुरुंबाडी), विवेक नाक्ती (आगरवाडा), जर्नादन पाटील (पाभरे), अंकुश हरिश्‍चंद्र म्हापणकर (खरसई) हे गोविंदा जखमी झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्‍टर महेश मेहता यांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत खालापूर तालुक्‍यातील चौक गावात दहीहंडीचा दोर बांधलेला पीलर कोसळून अंगावर पडल्याने शुभम दत्तात्रय मुकादम (17, रा. चौक) या तरुणाचा मृत्यू झाला. अजिंक्‍य विजय मोरे (20, रा. चौक) हा तरुण गंभीर जखमी झाला. चौक गावातील नवीन वसाहतीत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक गेले होते. गंभीर जखमी शुभम आणि अजिंक्‍यला तातडीने चौक ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच शुभमचा मृत्यू झाला.

तिसऱ्या घटनेत तळा तालुक्‍यातील कासेवाडी येथील रहिवासी विजय कृष्णा दर्गे (53) यांचा मिठागर नदीत बुडून मृत्यू झाला. दर्गे हे दहीहंडी संपल्यावर आपल्या गोविंदा पथकातील सदस्यांसोबत जवळच असलेल्या मिठागर नदीवर निर्माल्य सोडण्यासाठी गेले होते. निर्माल्य सोडण्यासाठी कृष्णा दर्गे यांनी पाण्यात उडी मारली असता ते पुन्हा वर आले नाहीत. आदिवासी वाडीतील व्यक्तींनी शोध घेतला असता सायंकाळी सव्वापाच वाजता त्यांचा मृतदेह मिळाला. या घटनेची पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार जगदाळे करीत आहेत.

loading image
go to top