मुंबईतील तीन रुग्णांमध्ये E484K या नवीन कोरोना व्हायरसची लक्षणे, डॉक्टरही आश्चर्यचकित!

भाग्यश्री भुवड
Monday, 11 January 2021

ब्रिटननंतर आता दक्षिण आफ्रिकेतील नवीन व्हायरसचे आढळले तीन रुग्ण, खारघरमधील टाटा मेमोरियल केंद्रात

मुंबई : कोरोना व्हायरसमध्ये नवनवे बदल दिसून येत आहेत. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेतील तिघांमध्ये नवीन व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. खारघरमधील टाटा मेमोरियल केंद्रात मुंबई महानगर प्रदेशातील तीन रुग्णांमध्ये E484K नवीन कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसमध्ये तीन प्रकारचे बदल (म्यूटेशन) आढळून आले आहेत, अशी माहिती हेमॅटोपाथोलॉजी विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. निखिल पाटकर यांनी दिली.

मुंबईतील रुग्णांमध्ये आढळून आलेला व्हायरस हा त्यापैकीच एक आहे. केंद्राच्या पथकाने 700 नमुन्यांची जीन सिक्वेसिंग केली होती. त्यापैकी, तीनमध्ये हा म्युटेशन असलेला व्हायरस आढळून आला आहे.

महत्त्वाची बातमी : किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेची फिल्डिंग, अब्रुनुकसानीचा फास्ट ट्रॅक न्यायालतात दावा ?

शरीरातील प्रतिकारशक्ती नव्या व्हायरसपुढे प्रभावी नाही -

हा व्हायरस दक्षिण आफ्रिकेतील कोरोना व्हायरससारखा असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. कोरोनाने रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या 3 प्रकारच्या प्रतिकारशक्ती या नवीन व्हायरसपुढे प्रभावी ठरलेल्या नाहीत. व्हायरसमध्ये बदल झाल्याने आधीच्या व्हायरसविरोधात तयार झालेली प्रतिकारशक्ती प्रभावी ठरत नाही.

संपूर्ण युरोपात आलेल्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेतील व्हायरस अधिक धोकादायक असल्याची चर्चा आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही कारण E484K हा व्हायरस सप्टेंबर 2020 पासून देशातील नागरिकांमध्ये आढळून आला आहे. हा व्हायरस झपाट्याने पसरला असता तर देशातील स्थिती बिकट झाली असती, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सार्स कोविड-2 ची तीन पुरुषांच्या शरीरात लक्षणे आढळली आहेत. त्यातील दोन रुग्ण रायगडमधील आणि एक ठाण्यातील आहे. त्यातील दोघांना होम क्वारंटाईनची गरज पडली. तर, एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. आता यावर लस किती प्रभावी असेल हे सांगणे थोडे कठीण आहे आणि हा अभ्यासाचा विषय आहे. महत्त्वाचे म्हणजे व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन फक्त सप्टेंबरमध्ये सापडला.

महत्त्वाची बातमी मुंबईकर आकांक्षा सोनावणेची गगनभरारी, उत्तर ध्रुवावरून प्रवास करत विमानोड्डाणाचा आगळावेगळा विक्रम

प्रोटोकॉलनुसारच कार्यपद्धती -

ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत नवीन स्ट्रेन सापडल्यापासून केंद्र सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण केले जात आहे. दक्षिण आफ्रिका, युरोप, मध्य-पूर्व आणि UK येथून येणार्‍या लोकांना विमानतळावरूनच आयसोलेशनसाठी पाठवले जात आहे. मुंबईत सापडलेले नवीन स्ट्रेनचे रुग्ण सर्व ब्रिटनहून परत आले आहेत. जर कोणतीही व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळली तर तिचे जीनोमिक सीक्वेन्सिंग देखील केले जात आहे. मुंबईकरांना घाबरून जाण्याची गरज नाही, आम्ही सावध आहोत, परदेशातून येणाऱ्या लोकांनी फक्त नियमांचे पालन करावे, असं सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (आरोग्य) म्हणालेत. 

( संपादन -  सुमित बागुल )

three patients with E484K new covid mutation detected in navi mumbai kharghar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three patients with E484K new covid mutation strain detected in navi mumbai kharghar