अटकेचा थरार! जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात...

दीपक शेलार
Monday, 3 August 2020

मटकाकिंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी सोमवारी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने जयपाल दुलगज ऊर्फ जपान या शुटरला अहमदाबाद (गुजरात) येथून ताब्यात घेतले.

ठाणे : मटकाकिंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी सोमवारी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने जयपाल दुलगज ऊर्फ जपान या शुटरला अहमदाबाद (गुजरात) येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधातील पुढील कारवाईसाठी पथकाने त्याला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जिग्नेश ठक्करची शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वेस्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या साडे चार लाखावर; तर 'इतक्या' रुग्णांना डिस्चार्ज

काम आटोपून कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. जिग्नेश याचे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर भागात अनेक पत्याचे क्लब असून, तो क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणूनदेखील काम करीत होता. त्याचा बालपणीचा मित्र धर्मेश ऊर्फ ननू शहा हा त्यास या धंद्यात साथ देत होता. गुंड प्रवृत्तीच्या धर्मेश याचे धंद्यातील पैशावरून जिग्नेशसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला. येथूनच दोघा मित्रांमध्ये कट्टर दुष्मनीस सुरुवात झाली. धर्मेश याचा मित्र चेतन पटेल व जिग्नेशमध्ये 29 जुलैला वाद झाला व तो हाणामारीपर्यंत पोहचला. याचवेळी धर्मेश याने जिग्नेश याचा काटा काढायचे ठरवले.

आपला दबदबा राहावा यासाठी धर्मेशने जिग्नेश यास ठार करण्याचा कट रचला. त्यानुसार धर्मेशने जयपाल व इतर दोघा-तिघा साथीदारांची मदत घेत शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशनजवळच्या सुयश प्लाझा बिल्डिंग कम्पाउंडमध्ये जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून सुरू होता. दरम्यान, यातील आरोपी जयपाल हा अहमदाबादमध्ये असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली.

विरारमध्ये आढळला जखमी अवस्थेतील 'ब्राऊन बुबी' पक्षी; उपचारासाठी पक्षीमित्रांची रुग्णालयात धाव

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने मुख्य सूत्रधारापैकी एक असणाऱ्या जयपाल ऊर्फ जपान यास अहमदाबाद येथून अटक केली. जिग्नेशला जयपालनेच चार गोळ्या झाडून ठार केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी खंडणीविरोधी पथकाने त्याला महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले.

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thrill of arrest! Gujarat shooter caught in Jignesh Thakkar murder case ...