मुरूडमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी
मास्क न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू
मुरूड, ता. ५ (बातमीदार) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुरूड पालिकेने मास्कविषयी जनजागृती सुरू केली आहे. तसेच बुधवार (ता. ५) पासून नियमांची अंमलबजावणी कठोर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुरूड पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर जनजागृती सुरू केली आहे. मासळी बाजार, मंडई, शाळा आदी ठिकाणी कर्मचारी नागरिकांशी संवाद साधून सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, मास्कचे महत्त्व पटवून देत आहेत.
मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले, की मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. आपली स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनापासून दूर राहण्यासाठी त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे. बुधवार (ता. ५) पासून विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांना दंड भरावा लागणार आहे. यासाठी आम्ही जनजागृती फेरी काढली.
जनजागृती करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, कर निरीक्षक नंदकुमार आंबेतकर, लेखापाल कपिल वेहेले, आरोग्य अधिकारी राकेश पाटील, नगर रचना सहायक साहिल मुजावर, प्रकाश आरेकर, सुदेश माळी, प्रशांत दिवेकर, अभिजित कारभारी, सतेज निमकर व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.