
सात तासांच्या संगीत कार्यक्रमातून खाँसाहेब आबीद हुसैन यांना अभिवादन
मुरूड, ता. २५ (बातमीदार) : खाँसाहेब आबीद हुसैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृती संगीत मंडळातर्फे नुकताच संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. तब्बल सात तास चाललेल्या या सोहळ्याला दिग्गज कलावंत उपस्थित होते. उस्ताद खाँसाहेब आबीद हुसैन हे मुरूड जंजिरा आणि बडोदा संस्थांचे राजगायक होते.
संगीत कार्यक्रमास खाँसाहेब आबीद हुसैन यांचे ३५ वर्षे सहवास लाभलेले त्यांचे शिष्य पंडित भव्यानंद भट महाराज यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. वयाच्या शंभराव्या वर्षीही त्यांच्या गायनाने संगीतरसिक मंत्रमुग्ध झाले.
बुऱ्हाणपूरचे प्रसिद्ध गायक डॉ. सतीश वर्मा व भोपाळचे सुप्रसिद्ध गायक उल्हास तेलंग यांच्या गायनाने रसिकांना खिळवून ठेवले. सुमारे सात तास चाललेल्या संगीत मैफलीत रसिक प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत भावे, कार्यवाह डॉ. रवींद्र नामजोशी यांनी खाँसाहेब आबीद हुसैन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. पंडित भव्यानंद भट महाराज यांचा मुरूड पालिकेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गिरिजा कीर संगीतप्रेमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या शीघ्रे येथील कुमार आरकशी आणि छायाचित्रकार नितीन शेडगे यांना जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनंत जोशी, प्रतिभा मोहिले, सिद्धेश लखमदे, गोविंद जोशी, ऊर्मिला जोशी, अच्युत चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद वर्दम यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..