
मुंबई : आरे कारशेड प्रकरणी मुख्यमंत्र्यांना साकडे
मुंबई : आरे कारशेड (Aare carshed) कांजूरला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) तीन वर्षांपूर्वी घेतला. असे असताना आरे कारशेड भागात रस्त्यालगत रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. ‘आरे कंझर्वेशन’ गटाने (Aare conservation group) याला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी केली आहे. ‘आरे कंझर्वेशन’ ग्रुपकडून रविवारी आरे परिसरात आंदोलन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांना पत्र लिहिण्यात आले.
हेही वाचा: नालासोपारा: हॉटेलमध्ये मैत्रिणीची हत्या; फरार आरोपीचा शोध सुरू
सरकारने ६ जानेवारी २०२१ रोजी मेट्रो ३ डेपो आरेबाहेर हलवण्यासाठी पर्यायी डेपोच्या जागेची शिफारशीसाठी समिती स्थापन केली होती. या समितीत ‘एमएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल आणि ‘एमएमआरडीए’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. सोनिया सेठी आणि संजय कुमार यांचा समावेश होता. त्यात त्यांनी मेट्रो मार्ग क्रमांक ३, ४ आणि ६ साठी कांजूर येथे कारशेड डेपो उभारण्याची शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी झोरू भाथेना यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी आरेमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या. याबाबत विचारले असता डेपोचे स्थलांतरण सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र स्थलांतराचे काम सुरू झालेले नाही, असे पत्रात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात ‘एमएमआरसीएल’ने आरे येथे बोगद्यातून बाहेर पडण्याच्या रॅम्पवर ट्रॅक ठेवण्याचे काम सुरू केले असल्याचे ‘वनशक्ती’ संस्थेचे प्रमुख स्टॅलिन डी. म्हणाले.
हेही वाचा: मुंबईतील कोरोना केंद्र बंद होणार; सीसीसी- २ मध्ये फक्त ४ रुग्ण
मेट्रो मार्ग क्रमांक ३ आणि ६ जोडणे आवश्यक आहे; मात्र हे मार्ग जोडण्यासाठी कुठेही तरतूद केलेली नाही. त्याउलट त्या परिसरात मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे बिबट्या आणि इतर वन्य जीव बिथरण्याची शक्यता आहे. मेट्रोला उशीर होणार नाही आणि आरेमध्ये मेट्रो कारशेड तयार होणार नाही याची खात्री मुंबईकरांना मिळावी, यासाठी विनंती करण्यात आली आहे. तसेच या समस्येचे निराकरण होईपर्यंत आरेमधील सर्व बांधकाम थांबवावे, अशी विनंती गॉडफ्राय पिमेंटा यांनी केली आहे.
आरे परिसरातील समस्या सोडवण्यासाठी ‘आरे कंझर्वेशन ग्रुप’ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून आरेतील अवैध बांधकामाविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी आरे कारशेडप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिले, तर मात्र तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरे कंझर्वेशन ग्रुपने दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..