कठोर कारवाईपासून महेश मांजरेकर यांना संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कठोर कारवाईपासून महेश मांजरेकर यांना संरक्षण
कठोर कारवाईपासून महेश मांजरेकर यांना संरक्षण

कठोर कारवाईपासून महेश मांजरेकर यांना संरक्षण

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’मुळे अडचणीत सापडलेले दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना आणि चित्रपटाच्या टीमला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. चित्रपटासंबंधी दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्ह्यात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना मंगळवारी दिले आहेत. चौकशीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी मांजरेकर यांच्या वतीने न्यायालयात देण्यात आली आहे.

पोलिसांनी मांजरेकर यांच्यासह दोन निर्मात्यांविरोधात ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलांचे अंत्यत आक्षेपार्ह लैंगिक वर्तन चित्रित करून ते प्रदर्शित केल्याचा प्रमुख आरोप त्यात ठेवण्यात आला आहे. सोमवारी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे त्यावर सुनावणी झाली. पोलिस चौकशीला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी हमी मांजरेकर यांच्या वतीने देण्यात आली. चित्रपटाचा ट्रेलर पाहून तक्रार दाखल केली आहे. प्रत्यक्षात असे असेल, असे नाही. एखादी कलाकृती म्हणून दिग्दर्शक काही बाबी मांडत असतो. त्याला तसा अधिकार कलाकार म्हणून असतो, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला. सिनेमाला सेन्सॉर मंडळाने ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद ॲड. शिरीष गुप्ते यांनी मांजरेकर यांच्या वतीने केला.

चौकशी करण्याचे आदेश
न्यायालयाने महेश मांजरेकर आणि ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर पुढील सुनावणी होईपर्यंत कठोर कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने त्याबाबत विशेष सत्र न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेऊन या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने माहीम पोलिस ठाण्याला दिले आहेत.