
परीक्षेबाबत सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका
मुंबई, ता. १ : दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या चर्चा आणि अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली असल्याने काही नाराज विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर परीक्षेसंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही विद्यार्थ्यांनी पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. काही विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलल्या जाणार असल्याचे मेसेजही प्रसारित होत असल्याने इतरांमध्ये गैरसमज पसरण्याची शक्यता असल्याने मंडळाने त्याविषयी खबरदारी घेत अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
बारावीच्या श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा १४ फेब्रुवारीपासून; तर दहावीच्या २५ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चपासून; तर दहावीची १५ मार्चपासून सुरू होणार असल्याने याची सर्व माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर आणि शाळा-महाविद्यालयांना देण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या संकेतस्थळावर असलेली माहितीच ग्राह्य धरावी आणि इतर कोणत्याही अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास न ठेवता आपल्या परीक्षांची योग्य तयारी करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.