
कुणाल राऊत यांना राज्य युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक मते
मुंबई, ता. ७ : युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. युवक काँग्रेसतर्फे अद्याप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीची औपचारिक घोषणा केली नसली तरी त्यांची या पदावर निवड जवळपास पक्की मानली जात आहे.
या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी १४ उमेदवार रिंगणात होते. १२ नोव्हेंबर २०२१ ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली होती. सदस्य बनताच ऑनलाईनरीत्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहर अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष असे चार मते द्यावी लागली होती. सदस्यता अभियानानंतर दिल्लीवरून आज उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक ५,४८,२६७ मते मिळाली आहेत. कुणाल यांचे जवळचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना 3,80,367 तर शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली. राऊत यांनी अनेक दिग्गज उमेदवारांना मागे टाकले आहे. युवक काँग्रेसच्या युवा मतदारांनी व राज्यातील युवा शक्तीने माझ्यावर जो विश्वास दाखविला, तो मी सार्थ करून दाखवेन, अशा शब्दांत कुणाल राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास मी जातीयवादी, भांडवली शक्ती आणि मोदी सरकारविरुद्ध जनतेत रान उठवेल, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..