
एक्स-ईबाबत चिंतेचे कारण नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईत एक्स-ई या नव्या कोविड उपप्रकाराची नोंद करण्यात आली. मात्र, एक्स-ई बाबतची मुंबईला चिंता करण्याची गरज नसून स्वसुरक्षेसाठी त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
मुंबईत बुधवारी ५० वर्षीय महिला एक्स-ई व्हेरियंटने बाधित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ती पूर्णपणे बरी झाली असून ती आता एक्स-ई निगेटिव्ह आहे. तसेच राज्याच्या आरोग्य विभागाकडून हा रुग्ण निगेटिव्ह असल्याचे सांगत एक्स-ई हा व्हेरियंट बीए-१ तसेच बीए-२ चे मिश्रण असून यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत गोंधळ उडाला असून आता याचे नमुने पश्चिम बंगालमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्सकडे पुढील विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर घाबरण्याचे कारण नाही. मात्र, मास्कला महत्त्व द्यावे, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. कोलकत्तात जे नमुने पाठवले आहेत, त्याचा अहवाल एक ते दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे, असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले. काकाणी म्हणाले की, हा रुग्ण सुरुवातीलाच बरा झाला आहे. तसेच तो कोणाच्याही हाय रिस्क संपर्कात आलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसून सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
अंतिम विश्लेषणाची वाट पाहत आहोत!
कस्तुरबा रुग्णालयातील जीनोम सिक्वेन्सिंग विभाग प्रभारी डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले की, आम्हाला हे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल संस्थेत पाठवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे गुरुवारी ते पाठवण्यात आले. आता अंतिम विश्लेषणाची वाट पाहत आहोत. मात्र, एक्स-ईचे अखेरचे निदान होणे बाकी आहे. एक्स-ईचे निदान जरी झाले तरी मुंबईकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईकरांना केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..