
‘एक्सई’ला घाबरण्याची गरज नाही!
मुंबई, ता. १२ : मुंबईत कोरोना विषाणूच्या ‘एक्सई’ व्हेरिएंटच्या दोन रुग्णांची नोंद झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र एक्सई व्हेरिएंटबाबत घाबरण्याची गरज नाही. सध्या परिस्थिती गंभीर नसून नागरिकांनी केवळ कोविड नियमांचे पालन केले पाहिजे, असा सल्ला कोविड टास्क फोर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
‘एक्सई’ हा व्हेरिएंट ओमिक्रॉन बीए १ आणि बीए २ उपप्रकारामुळे तयार झाला आहे. म्हणजे हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी हा डेटा खूपच कमी आहे. त्यामुळे फार घाबरण्याची गरज नाही, असे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले.
कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले, एक्सई व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद मार्च महिन्यात झाली. खरं तर आतापर्यंत त्याचा वेग पसरायला हवा होता, पण तसे झाले नाही. त्यामुळे आपण सध्या वेट अॅड वॉच ठेवला पाहिजे. आपल्याकडे बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. केवळ कोविड नियमांचे पालन केले पाहिजे, असे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर म्हणाले.
----
मुंबईकरांनी ‘एक्सई’ व्हेरिएंटबाबत फार काळजी करण्याची गरज नाही. रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याला एक महिना झाला आहे. गुजरातमध्ये आणखी एका रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे; मात्र त्याचा फारसा पसार झाला नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..