
गिरणी कामगारांचा शुक्रवारी निर्धार मेळावा
मुंबई, ता. १२ : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्याकरिता शुक्रवारी (ता. १५) नायगावमध्ये निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्या वतीने दुपारी तीन वाजता ललित कला भवनात होणाऱ्या मेळाव्यात गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
१५ वर्षांत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी चार वेळा घरांची सोडत काढण्यात आली. त्यातून १५ हजार ८७१ कामगारांसाठी घरांचे वाटप झाले. मात्र, कोनगाव येथील २ हजार ४१८ घरे आणि बॉम्बे डाईंग, श्रीनिवास मिल इत्यादी गिरण्यांची ३ हजार ८९४ घरे यापैकी एकही गिरणी कामगार व वारसाला घराचा ताबा देण्यात आलेला नाही. याप्रश्नी आणि गिरणी कामगारांना प्राधान्याने मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करणे, बॉम्बे डाईंग, श्रीनिवास मिल्स या गिरण्यांतील यशस्वी गिरणी कामगार व वारसदारांना घराचा ताबा देणे, अर्जाची छाननी करून सोडत काढणे इत्यादी मागण्यांबाबत या मेळाव्यात पुढील आंदोलन जाहीर करण्यात येईल, असे गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष कॉ. बी. के. आंब्रे यांनी सांगितले. या मेळाव्यात कामगार आणि वारसदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आंब्रे यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..