
मुंबईकरांची वीकेण्डला मेट्रो २ अ, मेट्रो ७ ला पसंती
मुंबई - वीकेण्डच्या (Weekend) दिवशी मुंबईकर (Mumbai) विरंगुळा म्हणून जवळच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देतात. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर हजर राहायचे असते. त्यामुळे त्यांनी जवळच्या जवळ मेट्रो २ अ (Metro) आणि मेट्रो ७ ची सवारी करून मौजमजा (Enjoy) करण्याकडे आपला मोर्चा वळवलेला दिसतो आहे. या दोन्ही मेट्रोमधून शनिवार-रविवारी या सुट्ट्यांच्या दिवशी सर्वाधिक प्रवासी प्रवास करण्याची नोंद होत आहे.
सध्या मेट्रोमधून दररोज ३१ हजार ५०० प्रवाशांचा प्रवास होत असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ हे दोन्ही प्रकल्प अंधेरी ते दहिसर या पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी उभारले आहेत. या प्रकल्पातून रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि रेल्वेमधील प्रवाशांच्या गर्दीचा भार कमी करण्याचे नियोजन आहे. मात्र सद्यस्थितीत या दोन्ही मेट्रोमधून फक्त शनिवारी आणि रविवारीच सर्वाधिक प्रवासी प्रवास करत आहेत. त्या मानाने इतर दिवशी कमी प्रवासी प्रवास करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिनी मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गाला हिरवा कंदील दाखविला. दहिसर ते डहाणूकर वाडी मेट्रो २ अ आणि दहिसर ते आरे मेट्रो ७ या दोन्ही ठिकाणांहून मेट्रोच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. या मेट्रोचे किमान १० रुपये, तर कमाल ४० रुपये तिकीट भाडे आकारले जाते. या दोन्ही मार्गांवर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवास करता येत आहे.
- मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ मधून २ एप्रिलपासून ते आतापर्यंत प्रत्येक दिवशी सरासरी ३१,५०० प्रवाशांनी प्रवास केला आहे.
- दोन्ही मेट्रोमधून २ एप्रिलपासून ते १८ एप्रिलच्या दुपारपर्यंत ५ लाख ९ हजार ५५५ प्रवाशांनी प्रवास केला.
- आरे स्थानकात सर्वाधिक तिकीटविक्री
- दोन्ही मेट्रोच्या सर्व स्थानकांवर एकूण २ हजार ४७८ अधिकारी आणि कर्मचारी
- दोन्ही मेट्रोमधील मोठ्या संख्येने कर्मचारी कंत्राटवर काम करत आहेत.
- हाऊस किपिंगसाठी कर्मचारी, जी.डी.एक्स, ऑल सर्व्हिस आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड`या कंपनीच्या कंत्राटवर आहेत.
- स्टेशन ऑपेरेशनसाठी लागणारे कर्मचारी हे डी. एस. एटरप्रायझेस आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कंत्राटवर आहेत.
- ट्रेन ऑपेरेशनसाठी कर्मचारी मेमकोच्या कंत्राटावर आहेत.
- सिक्युरिटीसाठी कर्मचारी एम.एस.एफ. आणि सी.एस.एस.च्या कंत्राटावर आहेत.
वीकेंडची प्रवासी संख्या
शनिवारी २ एप्रिल - १९ हजार १६७
शनिवारी ९ एप्रिल - ३५ हजार ०७९
शनिवारी १६ एप्रिल - २८ हजार ७९३
रविवारी ३ एप्रिल - ५६ हजार ७०४
रविवारी १० एप्रिल - ४८ हजार २८३
रविवारी १७ एप्रिल - ४० हजार ६५४
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..