
मुंबईतील ९८३ वृक्ष काँक्रिटमुक्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील पर्यावरण संतुलन राखणाऱ्या वृक्षांवर विविध प्रकारचे अतिक्रमण करून त्यांची कोंडी करण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने ‘वृक्ष संजीवनी’ या मोहिमेंतर्गत या झाडांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत विविध संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या मोहिमेने मुंबईत वेग धरला असून, आतापर्यंत ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढण्यात आले आहे; तर एक हजार ३२५ झाडांवरील जाहिरात फलक हटवले असून तब्बल ९४ किलो खिळेही काढण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेमार्फत उद्या (२२ एप्रिल) साजऱ्या होणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राबवण्यात येणाऱ्या वृक्ष संजीवनी मोहिमेमध्ये वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढून लाल माती टाकणे, वृक्षांवरील खिळे, पोस्टर, बॅनर, केबल्स काढून वृक्षांना मोकळा श्वास मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खिळे, पोस्टर, विद्युत रोषणाई, केबल आदींमुळे वृक्षांना इजा होते व त्या ठिकाणी झाडाचे खोड कुजून ते मोडून पडण्याची अथवा मृत होण्याची शक्यता असते. मुळांभोवती काँक्रीटीकरण केल्यामुळे वाढ खुंटते व जमिनीत पाणी न शोषल्याने वृक्ष मृत होण्याची शक्यता असते.
अशा विविध कारणांनी महापालिकेमार्फत १८ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत वृक्ष संजीवनी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रीट काढण्यात आले असून, सहा हजार १७८ वृक्षांवरील खिळे-जाहिरात फलक काढण्यात आले आहेत. एकूण ९४.१९४ किलो खिळे काढण्यात आले असून एक हजार ३२५ जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत.
पालिकेच्या उद्यान विभागामार्फत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्या साह्याने पालिकेच्या २४ विभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत पार्ले वृक्षमित्र, एकता मंच, रिव्हर मार्च एलएसीसी, अंघोळीची गोळी आदी सामाजिक संस्था, विविध शाळा-महाविद्यालये यांनी भाग घेतला होता.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..