
‘बेस्ट संपाला जबाबदार कंपनीकडून दंड आकारा’
मुंबई : खासगी बसचालकांना वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांनी संप पुकारला. त्यामुळे प्रवाशांची फरफट झालीच; पण बेस्टचे नावही खराब झाले. त्यासाठी कंत्राटदार कंपनी जबाबदार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना एका पत्राद्वारे केली आहे.
एम. पी. ट्रान्सपोर्टमार्फत चार आगारांमध्ये खासगी बसचालक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना वेतन न मिळाल्यामुळे ते संपावर गेले. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. बेस्ट उपक्रमाने खासगी कंपनीला प्रत्येक किलोमीटरप्रमाणे संपूर्ण अधिदान रक्कम दिलेली आहे.
तरीही तीन-चार आगारांमध्ये खासगी कर्मचारी संपावर गेल्यामुळे बेस्ट उपक्रमाला भुर्दंड सहन करावा लागत आहे, असे रवी राजा यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. संपामुळे बेस्ट उपक्रमाचे नाव खराब होत आहे. त्याचा परिणाम बेस्ट उपक्रमाच्या महसुलात होत आहे. तरी एम. पी. ट्रान्सपोर्टवर दंडात्मक कार्यवाही करून महसुलात होणारी घट त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..