शिष्यवृत्ती परीक्षेत
अथर्व खोत राज्यात सातवा
मुक्ता वारंगे राज्यात चोविसावी
महाड, ता. ९ (बातमीदार) : पाचवी आणि आठवीच्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत महाड आणि माणगाव तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी सरस कामगिरी केली. आठवीत ग्रामीण भागात गोरेगाव येथील ना. म. जोशी शाळेचा अथर्व संभाजी खोत हा राज्यात सातवा; तर महाड येथील थरवळ कन्या विद्यालयाची मुक्ता राहुल वारंगे राज्यात २४ वी आली.
रायगड जिल्ह्याचा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १५. ८३ टक्के; आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १३.५३ टक्के लागला. या परीक्षेसाठी पाच हजार ८३७ मुले बसली होती. त्यातील ९२४ उत्तीर्ण आणि ३७५ शिष्यवृत्ती पात्र ठरली. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीन हजार ५७६ मुले बसली होती, त्यातील ४८४ उत्तीर्ण व ३५५ शिष्यवृत्ती पात्र ठरली.
राज्याच्या आठवीच्या शिष्यवृत्ती यादीमध्ये ग्रामीण भागात अथर्व संभाजी यादव सातवा; तर रायगड जिल्ह्यात व माणगाव तालुक्यात पहिला आला आहे; तर मुक्ता राहुल वारंगे शहरी भागात राज्यात २४ वी आली; तर महाड तालुक्यात व रायगड जिल्ह्यात प्रथम आली.
महाड तालुक्यात आठवीच्या परीक्षेत ग्रामीण भागात आदित्य अमित सलागरे (सेंट झेवियर्स स्कूल- शिरगाव) हा ग्रामीण गटात महाड तालुक्यात पहिला; तर जिल्ह्यात पाचवा आला. याशिवाय शर्वरी संजय घाडगे ही समर्थ रामदास शाळेची विद्यार्थिनी ग्रामीण गटात जिल्ह्यात सहावी; तर तालुक्यात प्रथम आली. शंतनू विजय पवार (सेंट झेवियर शिरगाव) रायगड जिल्ह्यात आठवा आला.
अर्चना आनंद पाटील (थरवळ कन्या विद्यालय- महाड) रायगड जिल्ह्यात शहरी भागात पाचवी; तर अमेय शिवाजी यादव (परांजपे विद्यालय- महाड) रायगड जिल्ह्यात शहरी भागात आठवा आला. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ग्रामीण भागात भार्गव अमित मेथा (सेंट झेवियर्स स्कूल) याने रायगड जिल्ह्यात व महाड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला; तर वरुण अरुण फडतरे (सेंट झेवियर्स स्कूल) हा रायगड जिल्ह्यात व महाड तालुक्यात दुसरा आला.
....
शहरी भागात ओम उदय माने प्रथम
शहरी भागात ओम उदय माने (के. एस. इंग्रजी माध्यम) याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीदेखील या परीक्षेत मागे राहिले नाहीत. खैरे शेलटोली शाळेतील शिवत्मज पाटील रायगड जिल्ह्यात पाचवा व तालुक्यात तिसरा आला. श्रेया चंद्रकांत तांदळे (शाळा कांबळेतर्फे महाड) रायगड जिल्ह्यात सहावी व तालुक्यात चौथी आली. गार्गी शिवाजी पानस्कर, (सेंट झेवियर्स स्कूल रायगड) जिल्ह्यात आठवी आणि महाड तालुक्यात पाचवी आली. पाचवीला जिल्ह्यात पहिल्या १० पैकी पाच विद्यार्थी महाड तालुक्यातील आहेत.