महाडमधील ई-टॉयलेट निरुपयोगी
पालिकेचे लाखो रुपये पाण्यात
महाड, ता. १० (बातमीदार) : पालिकेने तीन वर्षांपूर्वी दोन ई-टॉयलेट सुरू केले होते. त्यांच्या वापराचे अज्ञान आणि अनेक जण त्यामध्ये अडकल्याने भीतीमुळे त्यांचा वापर बंद झाला आहे.
महाड पालिकेने स्वच्छता अभियानामध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर पुरस्कारही मिळवले. अशाच स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यासाठी पालिकेने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तीन वर्षांपूर्वी दोन ई- टॉयलेट सुरू केले; परंतु त्यांचा वापर करण्याची योग्य माहिती न मिळाल्याने अल्पावधीतच बंद पडले. जुलैमध्ये महापुरात या ई-टॉयलेटच्या शेजारी लावलेले पत्रेही रस्त्यावर वाकून आडवे झाले असल्याने अपघाताची शक्यता आहे.
महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथील बाजारपेठ आणि इतर सरकारी कार्यालयांत येणाऱ्या नागरिक आणि प्रवाशांची येथे कायम वर्दळ असते. स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शहरात या नागरिकांची गैरसोय होत आहे.
दोन ई-टॉयलेटसाठी महाड पालिकेने सुमारे २० लाख रुपये खर्च केले होते.
...
असे आहे ई-टॉयलेट
ई-टॉयलेट पूर्णपणे स्वयंचलित असल्याने त्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो. या ठिकाणी असलेल्या पेटीत पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडण्यापासून ते पूर्ण स्वच्छता करण्यापर्यंत सर्व कामे स्वयंचलित यंत्रणेने होत असतात. यासाठी काही बटणांचा वापर करावा लागतो. हे ई टॉयलेट स्वयंचलित असून याची स्वच्छताही सेंसर आधारित आहे.
.......
महाड शहरातील ई-टॉयलेट बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. काही नागरिक या बंद स्वच्छतागृहाच्या आडोशाला लघवी करतात. यामुळे या भागात दुर्गंधी पसरत आहे. प्रशासनाने हे
आडोसे दूर करून येथील स्वच्छता करावी.
- बंटी पाटील, स्थानिक नागरिक.
.......