रायगड किल्ल्यासह पर्यटन स्थळे बंद
कोरोना संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
महाड, ता. ११ (बातमीदार) : कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने रायगड किल्ल्यासह जिल्ह्यातील किल्ले आणि अन्य पर्यटन स्थळे बंद करण्याचे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (११) आदेश दिले. यामुळे हजारो व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आली होती. त्यानंतर रायगड, कुलाबा मुरूड-जंजिरा या गडकिल्ल्यांप्रमाणेच अलिबाग, काशीद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आदी पर्यटन स्थळे पुन्हा गजबजून गेली. या परिसरात व्यवसाय करणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. परंतु कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गड किल्ले व प्रेक्षणीय स्थळे , प्राणी संग्रहालय, वस्तू संग्रहालय पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे प्रमुख ऐतिहासिक स्थळ असणारे रायगड किल्ला, पाचाड येथील जिजामाता वाडा व समाधी स्थळ पर्यटकांसाठी पुढील आदेश मिळेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.
या बंदीबाबत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी फलक लावण्यात आले आहेत. थंडीचा हंगाम असल्यामुळे रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यामुळे महाविद्यालयीन सहली येथील अशी आशाही येथील व्यवसायिकांना होती.
डिसेंबरमध्ये येथील व्यवसायिकांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु आता पुन्हा किल्ला बंद झाल्याने सुमारे २०० व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले. हीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातील इतर ठिकाणांची आहे.
...
श्रीवर्धन व दिवेआगर या भागामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेल व होमस्टे सज्ज झाले होते. दिवेआगर मध्ये सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना पुन्हा झाल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दीही वाढू लागलेली होती. परंतु आता या ठिकाणांची गर्दी देखील कमी होणार आहे.
.............
रायगड किल्ला बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे पर्यटक येणार नाहीत. कोरोनामुळे दोन वर्षे व्यवसायावर परिणाम झाला. अजूनही हा त्रास सहन करत आहोत. नियमात शिथिलता आणून रायगड किल्ला सुरू करावा.
- अनंत देशमुख, व्यावसायिक