पालक गमावलेल्या मुलांना
१० हजारांची मदत मिळणार
‘बाल न्याय निधी’साठी अर्ज करण्याचे आवाहन
महाड, ता. १३ (बातमीदार) : कोरोनामुळे अनेक मुलांनी आपले मातृपितृ छत्र गमावले. ही मुले आणि त्यांच्या नातेवाइकांसमोर
भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला; परंतु आता असे छत्र हरवलेल्या मुलांना शैक्षणिक खर्चासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या अर्थसाह्यासाठी रायगड जिल्ह्यातील मुलांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १२ हजार २०१ रुग्ण असून ४ हजार ५९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील अनेक मुलांनी आई-वडील अथवा एका पालकाला गमावले. अशा मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून या मुलांना १० हजारांची मदत शैक्षणिक खर्चासाठी दिली जाणार आहे. रायगड जिल्ह्यासाठी बाल न्याय निधी आयुक्त महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या खात्यात हा निधी जमा केला आहे.
जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रतिबालक कमाल मर्यादा १० हजार रुपये देणार असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.
संपर्कासाठी पत्ता : एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तालुका संरक्षण अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नीलपुष्प बिल्डींग, एम.आय.डी.सी ऑफिस समोर, नागडोंगरी चेढरे, अलिबाग.
.....
मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे
१८ वयापर्यंतची मुले यासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांचे शाळेचे बोनाफाईड, आई/वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुरावा, आई-वडील मृत्यू दाखला, बालक अथवा बालक-पालक संयुक्त राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत बँकेचे पास बुक, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड या आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : योगीराज जाधव- ९९७०१२२६२३/७७९८१७१७७७.