काजू बियांचा दर घसरला
सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा
महाड, ता. ३० : उन्हाळ्यात काजू बिया विक्रीतून बागायतदार आणि कष्टकऱ्यांना चांगली कमाई होते; पण यंदा उत्पादन कमी आले असतानाही भावात प्रतिकिलोला ४० ते ५० रुपयांनी घसरण झाल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी काजू बियांचा दर १५० ते १६० रुपये किलो होता.
परकीय चलन मिळवून देणारे काजू हे कोकणातील प्रमुख पीक आहे. रायगड जिल्ह्यात दोन हजार ४०५ हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. हे क्षेत्र विस्तारत आहे. हे पीक घेण्यात दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर माणगाव, तळा हे तालुके आघाडीवर आहेत; परंतु गेल्या काही महिन्यांपासून हवामानात अचानक होणारा बदल, अवकाळी पाऊस यामुळे काजूचे उत्पादन ५० टक्के कमी झाले. एका चांगल्या काजूच्या झाडापासून सुमारे १२ ते १५ किलो काजू बियांचे उत्पादन मिळत असते; परंतु या वर्षी केवळ सहा-सात किलो काजू हाती लागत असल्याचे बागायतदार विनायक मोरे यांनी सांगितले.
गावोगावी सुक्या काजू बिया खरेदी करणारे अनेक लहान-मोठे व्यापारी येतात; परंतु या वर्षी बदलत्या हवामानामुळे चांगल्या प्रकारचा काजूगर तयार झाला नाही. त्यामुळे या व्यापाऱ्यांच्याही हाती चांगला नफा मिळाला नाही. हवामानाची साथ न मिळाल्याने दर्जेदार सुक्या काजू बिया विकणे बागायतदारांना शक्य होत नाही, अशी माहिती मोरे यांनी दिली. यंदा काजू बियांचा दर प्रतिकिलो १०० ते १२५ रुपये आहे. मागील वर्षी हा दर १५० ते १६० रुपये प्रतिकिलो होता. त्यामुळे बागायतदार, कष्टकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला.
......
वादळी पावसाने आंबा मोहर गळून गेला. त्यानंतर पावसामुळे कडधान्य देखील भिजले. आता काजू पीक संकटात आल्याने सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
- तुकाराम देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती संघटना.
..
काजू पिकावर दृष्टिक्षेप
रायगडमधील एकूण क्षेत्र (हेक्टर) : २४०५
यंदाचा दर (प्रतिकिलो/ रुपयांत) : १०० ते १२५
गेल्या वर्षीचा दर (प्रतिकिलो/ रुपयांत) : १५० ते १६०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.