पान एक-राणेंचे धक्कातंत्र; अध्यक्षपद दळवींकडे

पान एक-राणेंचे धक्कातंत्र; अध्यक्षपद दळवींकडे

सिंधुदुर्ग बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणेंचे धक्कातंत्र अध्यक्षपद दळवींकडे; तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर सकाळ वृत्तसेवा ओरोस, ता. १३ ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी; तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर ११ विरुद्ध सात मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडीतर्फे व्हिक्टर डांटस व सुशांत नाईक यांनी अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने यासाठी मतदान झाले. निवडीनंतर राणे यांनी जिल्हा बँकेत येऊन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार केला. लक्षवेधी ठरलेल्या बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. भाजपची सत्ता आल्याने राणे कोणाला संधी देतात याकडे लक्ष लागले होते; मात्र आमदार नीतेश राणे यांचे अत्यंत विश्वासू मनीष दळवी यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर करतानाच उपाध्यक्षपदी भाजपचे जुने पदाधिकारी अतुल काळसेकर यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे सर्वांचेच डोळे विस्फारले. त्यानंतर दोघांनी अर्ज दाखल केले. या निवडी बिनविरोध होतील असे वाटत असतानाच महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या डांटस; तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नाईक यांनी उमेदवारी दाखल केली. सकाळी ११ ते ११.३० या वेळेत अर्ज दाखल झाले. ११.४० पर्यंत अर्जांची छाननी झाली. सहकार निवडणूक निर्णयानुसार निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी गोपनीय मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवली. १२.३० नंतर ही प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी; नंतर उपाध्यक्षपदासाठी मतदान झाले. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना ११; तर महाविकास आघाडीला सात मते मिळाली. या वेळी दळवी, काळसेकर, संदीप परब, समीर सावंत, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, दिलीप रावराणे, प्रकाश बोडस, प्रज्ञा ढवण, रवींद्र मडगावकर, महेश सारंग हे भाजपचे; तर डांटस, नाईक, विद्याप्रसाद बांदेकर, विद्यानंद परब, गणपत देसाई, आत्माराम ओटवणेकर, मेघनाथ धुरी हे महाविकास आघाडीचे संचालक उपस्थित होते. केवळ काँग्रेसच्या नीता राणे अनुपस्थित होत्या. निवडीवेळी कडक बंदोबस्त होता. जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी संचालक प्रकाश मोर्ये, प्रकाश गवस, गुरुनाथ पेडणेकर, सभापती शर्वाणी गावकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या सावी लोके, श्वेता कोरगावकर, सायली सावंत, मेघा गांगण, दीपलक्ष्मी पडते, एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. --- राणे ठाण मांडून आतापर्यंत अनेकदा मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत, नगर परिषदा व जिल्हा बँक यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. अर्ज भरण्यापूर्वी काही वेळ आधी बंद लिफाफ्यातून नावे कळवली गेली. आजपर्यंत राणे कधीच निवडणुकीच्या ठिकाणी आले नाहीत. उलट निवड झालेले पदाधिकारी त्यांच्या घरी जाऊन आशीर्वाद व शुभेच्छा घेत होते; मात्र आज ते निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बँकेच्या प्रवेशद्वारावर आले होते. तेथे आपल्या सर्व संचालकांना सोडल्यावर ते जिल्हा परिषदेत जाऊन बसले होते. तेथून त्यांचे बँकेच्या या निवड प्रक्रियेवर बारीक लक्ष होते. निवड प्रक्रिया पूर्ण होताच ते स्वतः जिल्हा बँकेत येत अध्यक्ष दालनात थांबले होते. तेथे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आमदार नीतेश राणे भूमिगत असल्याने राणे उपस्थित होते, असेही सांगितले जाते. --- चौकट निवड होताच मनीष दळवी भूमिगत शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने अटकपूर्व जामिनासाठी मनीष दळवी यांची केस न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने त्यांना या निवडणुकीत उपस्थित राहून मतदान करण्याची मुभा दिली होती. त्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यावर मंत्री राणे व निवडणूक निर्णय अधिकारी खरमाळे यांच्या सदिच्छा स्वीकारल्यावर मनीष दळवी अचानक गायब झाले. त्यांनी अन्य कोणाच्याही शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. --- चौकट महाविकास आघाडीच्या नीता राणे अनुपस्थित भाजपचे बहुमत असताना महाविकास आघाडीनेही अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडीकडे आठ संचालक आहेत. त्यातील काँग्रेसच्या नीता राणे निवड प्रक्रियेवेळी अनुपस्थित होत्या. त्यामुळे विरोधकांचे एक मत कमी झाले. तरीही महाविकास आघाडीने अर्ज दाखल केल्याने भाजपचे संचालक फुटले की काय अशी चर्चा सुरू होती; परंतु भाजपच्या गोटातून विरोधकांच्या सात संचालकांतून एक मत आमच्या उमेदवाराला मिळणार आणि १२ मते होणार, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात कोणाचीही मते फुटली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com