सुगड घडवण्यासाठी कारागिरांची लगबग
संक्रांतीसाठी कुंभारवाड्यात उत्साहाचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : कुंभारवाड्यात सध्या संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरू आहे. संक्रांतीसाठी लागणारे सुगड्या, बोळकी बनवण्याचे काम या कुंभारवाड्यातून केले जाते. कुंभार समाजातील नवी पिढीही या कामात उत्साहात सहभाग घेताना दिसत आहे.
ग्रामीण भागात संस्कृती जपत सण उत्साहात साजरे केले जातात. त्यात जुन्या काळातील रुढी-परंपरांचाही समावेश असतो. संक्रांतीचा सण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका सण. तिळगुळ घ्या... गोड गोड बोला... असा संदेश देत समोरच्याप्रती प्रेम, आपलुकी, आदर व्यक्त करण्याची संधी या सणाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. कोरोनामुळे एकमेकांना प्रत्यक्ष न बेतलेल्याना एकमेकांबद्दल आपुलकी व्यक्त करण्याची ही नामी संधी आहे. महिलांसाठी हा विशेष सण समजला जातो. या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात. हे वाण देण्यासाठी ज्या मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो त्याला सुगड म्हणून संबोधले जाते. धातू आणि प्लॅस्टिकच्या वापरणे मातीची भांडी वापरणे बंद झालेले आहे, मात्र मातीच्या सुगडीचा वापर अद्याप कायम आहे. तो वापर दरवर्षी वाढत जात असल्याने संसुकृतिक परंपरा जपण्याकडे लोकांचे आकर्षण असल्याचे म्हणणे सुनील पेणकर या सुगड कारागिराने आहे.
अलिबाग तालुक्यातील तळकर नगर, अंबेपुर, रमराज, पेझारी येथे कुंभारवाड्यात ही सुगडी आणि बोळकी मोठ्या प्रमाणात बनवली जातात. संक्रांतीनिमित्त या कामांना वेग आला आहे. शेतातून आणलेली माती चाळूण पाण्यात भिजवली जाते. त्यानंतर ती पायाने तुडवली जाते. मातीचा गोळा गोल फिरणाऱ्या चक्रावर ठेऊन त्याला आकार दिला जातो. या कसरतीत कुटुंबातील प्रत्येक सदस्य मदत करत असतो.
कोट ----
आधुनिक काळात वाढती प्रगती पाहता कुंभार समाज आजही गरिबीच्या परिस्थितीच आपला व्यवसाय करत आहे. प्रगतीच्या वाटेवर जात असताना मातीपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या किंमती मात्र, जशाच तशा आहेत. प्रचंड मेहनत आहे मात्र, योग्य मोबदला मिळत नाही.
- वसंत चौलकर, कुंभार समाज नेते