जिल्हाधिकारी कार्यालयात
कोविड हेल्पलाईन कक्ष
रुग्णांना उपचारासाठी माहिती मिळणार
अलिबाग, ता. ६ : ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर कोविड हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कक्षातून ९४०४८१५२१८, ९४२१८५२२१८, ९४२३७१२२१८, ८२७५५४४२१८ या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे रुग्णांना उपचारासाठी खाट व्यवस्थापन आणि कोविड बाबत माहिती देण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी या कक्षातच रॅपिड ॲन्टिजेन चाचणीची सुविधा सुरू करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना दिले.
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.