खड्डेमय रस्त्याचा पर्यटनावर परिणाम
नागावमधील व्यावसायिकांचे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
अलिबाग, ता. ६ (बातमीदार) : नागावमधील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा वाहतुकीवर परिणाम होत असल्याने कोंडीत भर पडत आहे. पर्यटकांना कोंडीचा त्रास होत असल्याने हॉटेल, कॉटेज व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. सततच्या या समस्येमुळे स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले आहे.
नागाव हे ऐतिहासिक स्थळ असून एक धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. नागावला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. ऐतिहासिक, धार्मिक स्थळांसह येथील पर्यटन स्थळांचे दर्शनदेखील होत असल्याने सुट्टीच्या दिवशी नागाव समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जातो; परंतु अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नागाव समुद्र किनाऱ्यापर्यंत जाणाऱ्या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करणे नकोसे होत आहे. त्यामुळे अनेक वेळा पर्यटक या मार्गावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. या खड्डेमय रस्त्यामुळे अपघातही होण्याची भीती निर्माण झाली असून धुळीमुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
चौकट
स्थानिकांना फटका
नागावमध्ये खड्ड्यांची समस्या निर्माण झाल्याने येथील व्यवसायही आर्थिक अडचणीत सापडू लागला आहे. याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे रस्त्यासाठी मागणी केली; परंतु हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले आहे, तर रस्ता वर्ग झाल्याचे पत्र अद्याप मिळाले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. या दोन विभागाच्या टोलवाटोलवीचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसू लागला.