अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात
सुधागड तालुक्यातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाली, ता. ६ (वार्ताहर) : सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषण आणि घाणीने वेढले आहे. काही रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यासह टाकाऊ पदार्थांमुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे.
पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. तसेच सुधागड तालुक्यातील अंबा नदीशेजारील गावांतील नागरिकांच्या पिण्यासाठी हीच नदी जीवन ठरली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे बांधून या नदीचे पाणी अडवण्यात येते. त्यामुळे या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. नदीतून वाहून आलेले प्रदूषित पाणीही त्यामुळे साठून राहते. काही रासायनिक कंपन्यांमधून रसायने थेट नदीत सोडण्यात येतात. परिणामी, अधिक प्रदूषण झाले आहे. पाण्याला सध्या उग्र दुर्गंध येत आहे. पाण्याची चवही बदलली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
....
असा आहे अंबा नदीचा प्रवास
खालापूर तालुक्यातील चावणी आंबेनळी घाट व सुधागड तालुक्यातील मानखोरे या दोन ठिकाणांहून अंबा नदीचा उगम होतो. पुढे हे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन मोठी नदी तयार होते. अनेक गावे समृद्ध करत ही नदी वडखळजवळ धरमतरच्या खाडीला जाऊन मिळते. तब्बल ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास ही नदी करते. खालापूर, सुधागड, रोहा आणि पेण अशा साधारण चार तालुक्यांतून नदी वाहते. यातील सर्वाधिक प्रवास सुधागड तालुक्यातून होतो; मात्र विविध कारणांनी अंबा नदीचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.
....
शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीला कोणतीही प्रक्रिया न करता अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. या शहरासाठीची शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. २००८-०९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या आणि शहरात दररोज येणारे भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण सात कोटी ७९ लाखांचा निधी आणि १० टक्के लोकवर्गणीद्वारे नळयोजना उभी राहणार होती, परंतु राजकीय श्रेयवादामध्ये योजना रखडली गेली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्नदेखील होता; मात्र पालीला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता ही रक्कम आणखी वाढली. लोकवर्गणीची अट शिथिल करण्यात आली आहे, पण अजूनही योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सर्वच राजकीय पक्ष योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल करतात. नगरपंचायत प्रस्थापित झाल्यावर तरी ही समस्या मार्गी लागेल अशी अपेक्षा पालीकर करत आहेत.
...
अंबा नदीचे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हे प्रदूषण थांबवून अंबा नदी संवर्धनाची व योग्य नियोजनाची गरज आहे. जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित झाली पाहिजे.
- प्रशांत हिंगणे, सामाजिक कार्यकर्ते, पाली
…
अंबा नदीचे पाणी दूषित झाले आहे. यासंदर्भात नदी किनाऱ्यांवरील सर्व कंपन्यांना नोटीस पाठवलेली आहे. गटविकास अधिकाऱ्यांशी शुक्रवारी बैठक आयोजित केली आहे. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, सुधागड