वानरलिंगी सुळका सर
सिंधुताई सपकाळ यांना गिर्यारोहकांची मानवंदना
पाली, ता. ९ (वार्ताहर) : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना सुधागड तालुक्यातील मॅकविला द जंगल यार्ड या संघटनेच्या साहसी प्रस्तरारोहकांनी शुक्रवारी (ता.७) जुन्नर तालुक्यातील वानरलिंगी हा ४०० फूट सुळका सर केला. सुळक्याच्या टोकावर दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सुळक्यावर भारताचा झेंडा फडकवण्यात आला.
मोहिमेत सुधागड तालुक्यातील प्रस्तरारोहक व ''मॅकविला द जंगल यार्ड'' चे संस्थापक मॅकमोहन हुले आणि त्यांचे सहकारी प्रणय पाटील, अभिजित राजगुरू व विकी घोडके हे सहभागी होते.
वानरलिंगी या सुळक्याने प्रस्तरारोहकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. १९८३ मध्ये मुंबईच्या गिर्यारोहक क्लबने प्रथम प्रस्तरारोहण केले होते. हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे. या सुळक्याची प्रस्तरारोहण श्रेणी अतिशय कठीण आहे.
सिंधुताईंचे कार्य महान आहे. त्यांच्या जाण्याने अनाथांची माय हरपली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी ही अनोखी मानवंदना देण्यात आली, असे मॅकमोहन हुले यांनी सांगितले.