कर्जत तालुक्यांत ४५ लाखांची विकास कामे
आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन
कर्जत, ता.१३ (बातमीदार) : तालुक्यात जिल्हा नियोजन नागरी सुविधेअंतर्गत आणि ग्रामविकास विभागाच्या साह्याने ४५ लाखांची विकास कामे करण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यामध्ये कर्जत कल्याण मार्गावरील पोतदार रहिवासी संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी १९ लाख; तर नेरळ शहरातील जिजामाता उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी १५ लाख, शेलू गावातील केबीके नगर येथील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे. नेरळ ग्रामपंचायतीला कचरा गोळा करण्यासाठी दोन टॅक्टर देण्यात आले. याचबरोबर नेरळ शहरात ओपन जिम तयार करून तिचा उद्घाटन सोहळाही यावेळी आमदार थोरवे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी नेरळ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य धर्मानंद गायकवाड, माजी सदस्य जयवंत साळुंखे, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, युवा शहर अध्यक्ष प्रसाद थोरवे, अंकुश दाभने, आबासाहेब पवार, केतन पोतदार, सावळाराम जाधव, प्रभाकर देशमुख, नितीन कांदळगावकर, अजिंक्य मनवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.