जात पडताळणी कार्यालयाचा अजब कारभार
शाळा प्रवेश नोंद उताऱ्यासाठी रिकाम्या हाती परतण्याची वेळ
अलिबाग, ता. १३ (बातमीदार) : येथील जात पडताळणी कार्यालयात निकषानुसार जोडण्यात आलेल्या पुराव्याव्यतिरिक्त शाळा प्रवेशाच्या नोंदीच्या उताऱ्याची मागणी करण्यात येते. या प्रकारामुळे नागरिकांची दगदग वाढली आहे. जात पडताळणी कार्यालयाच्या या अजब कारभारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जात पडताळणी कार्यालय असावे, असा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०१६ पासून रायगडमध्ये समिती कार्यालय चेंढरे येथे सुरू झाले. कार्यालयात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांची व्यावसायिक शिक्षणासाठी, तर वेगवेगळ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची समितीमार्फत जात पडताळणी केली जाते. त्यासाठी शिफारस पत्र, ऑनलाईन केलेला अर्ज, तसेच वेगवेगळे दाखल्यांची प्रत जोडून कार्यालयात जात पडताळणीसाठी अर्ज जमा केला जातो; परंतु गेल्या काही दिवसांपासून पडताळणी समितीकडून जोडण्यात आलेल्या पुराव्यामध्ये प्रवेश नोंदीचा उतारा घेण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे जात पडताळणीसाठी आलेल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना कागदपत्रे जमा न करता रिकाम्या हाती परतण्याची वेळ येत आहे.
-------------------------
मुलीच्या शिक्षणासाठी जात पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून कार्यालयात जमा करण्यासाठी आलो. त्यामध्ये माझ्या नावाचा जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्यात आले असून लागणारा शाळा सोडण्याचा पुरावा देखील जोडण्यात आला; परंतु या कार्यालयाकडून शाळेत प्रवेश नोंदीचा दाखला मागण्यात आला आहे. या प्रकारामुळे आता परत रिकाम्या हाती जावे लागते. सर्व पूर्तता करूनही या दाखल्यासाठी अडविले जात आहे.
- गणेश आरेकर, नागरिक.