सुकट, वाकटी, बोंबील १५० रुपयांनी स्वस्त
समुद्रातील माशांची आवक वाढल्याने खवय्यांची चंगळ
अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १३ (वार्ताहर) : सुक्या मासळीची बाजारातही आवक वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे दर घटले आहेत. दोन हजार ते २२०० रुपये किलोने मिळणारे सोडे आता १६०० ते १८०० रुपये किलोने मिळत आहेत. सुकट, वाकटी, बोंबील आदींच्या किमतीही १०० ते १५० रुपये प्रतिकिलोने घटल्या आहेत. त्यामुळे खवय्यांची चंगळ आहे.
जिल्ह्यातील आठवडा बाजार आणि मासळी बाजारात सुकी मासळीच्या खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. पर्यटक देखील आवर्जून सुकी मासळी खरेदी करतात. लॉकडाऊनच्या भीतीने देखील काही जण सुक्या मासळीचा साठा करीत आहेत. मागील महिन्यात खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे खोल समुद्रातील मासेमारी कमी झाली होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात मासळी सापडत होती. सापडलेली मासळी ताजी विकण्यावर मच्छीमारांचा कल होता. मात्र आता मासेमारी जोरात सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. हे मासे सुकविण्याकडे कल दिसत आहे.
................................
सुक्या मासळीचे भाव सध्या उतरले आहेत. त्यामुळे सुकी मासळी खरेदी करत आहोत. या मासळीचा दर्जा देखील चांगला आहे.
- प्रियांका गोसावी, सुकी मासळी खवय्या, माणगाव.
......
मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव कमी झाले आहेत. समुद्रात मुबलक मासे मिळत आहेत. त्यामुळे राहिलेली मासळी सुकविण्याकडे अधिक कल असल्याने आवक वाढली आहे. भाव देखिल कमी झाले आहेत.
- सरफराज पानसरे, सुकी मासळी विक्रेता, पाली
...................
सुकी मासळी भाव
मासे डिसेंबर जानेवारी (प्रतिकिलो/रुपयांत)
साधे सोडे - १६००- १२०० -
अंबाडी ५०० - ४००
जवळा ३०० -२४०
बोंबील ५००-४००
साधी सुकट ३००-२००
माकुल ६०० - ५००
वाकटी ५००- ४००
मांदेली २५०-२००
रेपटी २५०- २००