तक्रारदारच निघाला आरोपी
ं
ऑनलाईन बदनामीप्रकरणी तिघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : अवैध रेती उत्खननात तक्रारी करण्यात येत असल्याने व्यवसायात आपले नुकसान होत आहे. यासाठी विरोधकाचा काटा काढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत बनावट फेसबुक खात्यावरून महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवण्यात येत होते. या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने छडा लावत तक्रारदारच आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. यातील मुख्य सूत्रधार असणारे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर यांसह दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना शुक्रवारपर्यंत (ता. १४) पोलिस कोठडी सुनावली.
अलिबागमध्ये उमेश ठाकूर हा रेती व्यावसायिक आहे. धरमतर खाडीतील त्याच्या अवैध रेती उत्खननासंदर्भात पेण तालुक्यातील कोलेटी येथील ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी वेगवेगळ्या कार्यालयांत तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे उमेश याचे नुकसान होत होते. आपल्याविरोधातील तक्रारीने उमेश याने हैराण होऊन काशिनाथ यांचा काटा काढण्याचा प्लान आखला. शुभम गुंजाळ याच्या मदतीने काशिनाथ ठाकूर यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले आणि आपल्याच ओळखीतील महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवले. याप्रकरणी महिलेने काशिनाथ ठाकूर यांच्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
तपासासाठी अंमलदार पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी सायबर सेलची मदत घेण्याचे ठरवले. या तपासात शुभम गुंजाळ हा सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्याची सखोल चौकशी केली असता उमेश ठाकूर हा या कटाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. ज्या महिलेने तक्रार दिली होती, ती महिला या कटात सहभागी होती असे उघड झाले. अखेर पोलिसांनी अॅड. उमेश ठाकूर, शुभम गुंजाळ आणि मनीषा चोरडेकर या तिघांनाही अटक केली आहे. प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल झाला आहे.