तहसीलदार रायण्णावार यांच्यासाठी
आदिवासी समाजाचे साकडे
बदली थांबवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पाली, ता. ३१ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तहसीलदार दिलीप रायण्णावार यांची आगामी काळात होणारी प्रशासकीय बदली थांबवावी, यासाठी सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी नुकतेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सुधागड तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. गेली तीन वर्षे तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तहसीलदारांनी प्रयत्न केले. आदिवासी बांधव व सर्वसामान्यांना तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांची दारे उघडी करून बऱ्याचशा योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
सरकारी कार्यालयात जाण्यासाठी घाबरणारा ठाकूर आणि कातकरी समाज हा रायण्णावार यांच्या प्रोत्साहानामुळे निःसंकोच जाऊ लागला आहे. त्यांची कामे देखील सहजतेने होत आहेत. आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी तहसीलदारांनी बरेचसे उपक्रम हाती घेतले आहेत. वेगवेगळ्या संस्थांचा सहभाग घेऊन तालुक्याचा विकास केला आहे. त्यांनी हाती घेतलेले उपक्रम पूर्णत्वास येण्यासाठी व सातत्याने सुरू राहण्यासाठी त्यांची बदली करून नये, असे म्हणणे कातकरी व ठाकूर समाजाचे अध्यक्ष व सर्व आदिवासी बांधवांचे आहे.
कातकरी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, ठाकूर समाजाचे अध्यक्ष यशवंत हंबीर, उपाध्यक्ष विश्वास भोई, राजू बांगारे, आदिवासी नेते रमेश पवार, दगडू वाघमारे, कृष्णा वाघमारे, दशरथ वालेकर व लक्ष्मण पवार हे निवेदन देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.