जेटीअभावी बोटी समुद्रकिनारी
सासवणेतील मच्छीमारांची गैरसोय
अलिबाग, ता. ३१ (बातमीदार) : मासे विक्रीची दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील मच्छीमारांसाठी बंदर नाही. या गैरसोयीमुळे मच्छीमारांना मांडवा बंदराजवळ समुद्रातच बोटी नांगराव्या लागतात. राज्य आणि केंद्र सरकारकडे जेटी बांधण्याची वारंवार मागणी करण्यात आली असली तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याने मच्छीमार संताप व्यक्त करत आहेत.
सासवणे गावात शंभरपेक्षा अधिक मच्छीमार बोटी आहेत. याद्वारे तीन हजारपेक्षा अधिक नागरिकांना रोजगार मिळतो; परंतु या मच्छीमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने जेटीचा (बंदर) समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंदरासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे; परंतु दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बोटी मांडवा बंदरामध्ये समुद्रकिनारी उभ्या करतात.
...
सासवणेचे मासे मुंबई बाजारात
सासवणे गावातील मासेमारी व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. येथील मासळीला स्थानिक हॉटेल व्यावसायिकांपासून मुंबईपर्यंतच्या हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी आहे.
-----------------
सासवणे ग्रामस्थांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायाला त्यांच्या कुटुंबाचाही हातभार असतो. अनेकांनी कर्ज काढून बोटी घेतल्या आहेत; परंतु बोटी उभारण्यासाठी स्वतंत्र असे बंदर नसल्याने मांडवा किंवा अन्य बंदरावर बोटी उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे सरकारने मच्छीमारांसाठी स्वतंत्र बोटी उभारण्यासाठी बंदर बांधावे.
- एकनाथ नाखवा, सदस्य, रायगड जिल्हा मच्छीमार संघ.