घरपट्टी, पाणीपट्टी वसुली ऑनलाईन
जिल्हा परिषदेची ‘ग्राम डिजिटल'' कर प्रणाली सुरू
प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम विकासावर होतो. हीच बाब लक्षात घेत रायगड जिल्हा परिषदेने या दोन्हींच्या वसुलीसाठी ऑनलाईन सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. ‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’द्वारे हे काम पूर्ण होणार असून पारदर्शकता येणार आहे. यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर वापरणारी रायगड ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी पाणी आणि घरपट्टी घरोघरी जाऊन वसूल करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. अनेक वेळा वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागते. रायगड जिल्हा पर्यटनाच्या आणि औद्योगिकीरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे गावांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना अशी वसुली करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसेच शंभर टक्के कर वसुली न झाल्याने गावांचा विकास साधता येत नाही. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली सुरू करण्यात आली. यासाठी विशेष सॉप्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे.
.........
नवीन वसुलीवर दृष्टिक्षेप
- ऑनलाईन कर प्रणालीद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा प्रयत्न
- रोखीत, धनादेश आणि कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध
- नवीन कर प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर १५ ग्रामपंचायतीमार्फत सुरू
- कर वसुलीची माहिती ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे राहणार
- कर वसुलीनंतर नागरिकांना मोबाईलवर संदेश
- घरपट्टी व पाणीपट्टीच्या पावती तातडीने मिळणार
..................
घर क्रमांकाचा बिल्ला कालबाह्य
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील घराच्या दरवाजासमोर ग्रामपंचायतीमार्फत घर क्रमांकाचा बिल्ला लावला जातो. त्यानुसार घर क्रमांकाची माहिती नागरिकांना मिळते. परंतु आता हा बिल्ला कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदेने अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमार्फत कर वसुली करीत असताना प्रत्येक घरासमोर घर क्रमांकाच्या बिल्ल्याऐवजी क्यूआर कोडचे लेबल लावले जाणार आहे. यातून ग्रामपंचायत कर्मचारी क्यूआरकोड स्कॅन करून घरपट्टी व पाणी पट्टी वसूल करू शकतो.
....
रायगड जिल्ह्यावर दृष्टिक्षेप
एकूण ग्रामपंचायत - ८१०
ग्रामीण भागातील लोकसंख्या - १६ लाख ६४ हजार ०५
गावांची संख्या - एक हजार ८००