...आणि तरुण सायकलवरून आत्महत्या रोखण्याचा संदेश घेऊन निघाला भारत भ्रमंतीला | corona impact | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay banjara
...आणि तरुण सायकलवरून आत्महत्या रोखण्याचा संदेश घेऊन निघाला भारत भ्रमणासाठी

...आणि तरुण सायकलवरून आत्महत्या रोखण्याचा संदेश घेऊन निघाला भारत भ्रमंतीला

पाली : कोरोनामुळे (corona) अनेकांचे रोजगार हिरावले. जवळचे नातेवाईक दूर झाले. अशीच परिस्थिती संजय बिस्वास उर्फ संजय बंजारा (Sanjay Banjara) (वय ३२) या तरुणावर आली. त्यामुळे त्याने नैराश्यात जाऊन आत्महत्येचा (suicide attempt) अयशस्वी प्रयत्नही केला. त्यानंतर मात्र सायकलिंगने (cycling) त्याला नवचेतना देऊन तारले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले. मग हा तरुण सायकलवरून आत्महत्या रोखण्याचा संदेश (social message) घेऊन भारत भ्रमणासाठी निघाला आहे.

संजय मूळचा वेस्ट बंगाल कोलकाता येथील रहिवासी आहे. ३० ऑगस्टपासून संजय सायकलवरून भारत भ्रमंतीवर निघाला आहे. आतापर्यंत त्याने ११ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. कोलकाता-आसाम-हिमाचल प्रदेश-जम्मू आणि काश्मीर- पंजाब-हरियाणा-दिल्ली-राजस्थान-गुजरात आणि मुंबईवरून प्रवास करत रायगड जिल्ह्यात दाखल झाला आहे. नुकतीच संजयची खालापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक दिनेश बांगर यांच्यासोबत खोपोली येथे गाठ पडली.

बांगर यांनी त्याच्यासोबत संवाद साधला व सहकार्यही केले. त्यानंतर पालीच्या दिशेने संजय पुढच्या प्रवासाला निघाला. संजयचा रेस्टॉरंटचा व्यवसाय अगदी उत्तम चालत होता. मात्र, कोरोनामुळे २१ मार्च २०२० ला लॉकडाऊन लागले. त्यानंतर रेस्टॉरंटचा व्यवसाय बंद पडला. आता पुढे काय या विचाराने त्याने स्वतःला तब्बल साडेतीन महिने एका खोलीत कोंडून घेतले. पैसा जवळ नसल्याने हळूहळू जवळचे सर्व नातेवाईक व मित्र त्याला या परिस्थितीत सोडून गेले. मदतीला कोणीच आले नाही. या नैराश्यात आणि एकाकीपणामुळे त्याने आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला.

मात्र, दरम्यानच्या काळामध्ये त्याला कुणीतरी सांगितले की तू सायकलिंग कर ज्यामुळे तुला नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत होईल. मग तो रोज सायकलिंग करू लागला. काही दिवसांनी रोज ५० ते १०० किमी सायकलिंग करू लागला. परिणामी, त्याचे नैराश्य व एकाकीपणा पूर्णपणे गेला. मग मात्र त्याने नागरिकांना आत्महत्येपासून दूर करण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. नैराश्याने व अपयशाने कंटाळून आत्महत्या करू नका, हा संदेश घेऊन तो भारतभर सायकलवरून भ्रमंती करत आहे. जिथे थांबतो तिथे लोकांशी संवाद साधतो. विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शनही करतो.

त्याला यू-ट्युब, फेसबुक व ट्विटरवर @sanjaybanjara येथे कोणीही फॉलो करू शकतो. ध्येयावर ठाम काही दिवसांपूर्वी संजयचे सख्खे काका मृत्यू पावले तरी ही तो मागे फिरला नाही. सर्व दुःख बाजूला ठेऊन त्याच्या ध्येयामागे धावत आहे. त्याचा हा प्रवास अजून पाच महिने असाच चालणार आहे. अशी आहे सायकल संजयची सायकल अत्यंत साधी व जुनी आहे. सायकलला तिरंगी झेंडा आणि ऑल इंडिया टूर, तसेच त्याचे नाव असलेल्या पाट्या लावल्या आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी संदेश देणाऱ्या विविध पाट्याही त्याने लावल्या आहेत. फोटो ओळ पाली : सायकलवरून भारत भ्रमणासाठी निघालेला संजय बिस्वास हा तरुण.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..