अवघे ८८१ सक्रिय कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघे ८८१ सक्रिय कोरोना रुग्ण
अवघे ८८१ सक्रिय कोरोना रुग्ण

अवघे ८८१ सक्रिय कोरोना रुग्ण

sakal_logo
By

अलिबाग, ता. १३ : एक महिन्यापूर्वी १३ जानेवारीला रायगड जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्ण संख्येने १३ हजारांचा आकडा पार केला होता. त्यादिवशी एका दिवसात दोन हजार ५६७ नवीन रुग्णांची भर पडली होती. तिसऱ्या लाटेतील ही सर्वोच्च रुग्ण संख्या होती. त्यानंतर सातत्याने ही संख्या कमी होत असून फक्त ८८१ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ९० टक्के सौम्य लक्षणांचे असल्याने गृहविलगीकरणात आहेत.

रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. बहुसंख्य शाळा, महाविद्यालये पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहेत. त्याचबरोबर पर्यटनस्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागल्याचे समाधानकारक चित्र रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही आता अंतिम टप्प्यात आहे. पहिला डोस ९५ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी घेतला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत २२ लाख ५ हजार नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे; तर मुलांच्या लसीकरणालाही वेग येत आहे. जिल्ह्यात १ लाख १८ हजार मुलांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीही संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार कमी होत आहे. ८८१ सक्रिय रुग्णांपैकी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५५ रुग्ण दाखल आहेत. उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिली.
दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्याही कमी होत आहे. दुसऱ्या लाटेत दररोज २५०० पर्यंत रुग्ण सापडत होते. तिसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या कमालीची वाढली होती. आता ही संख्या १०० पेक्षा कमी आहे.
........................
कोरोनाची भीती जाणवत असली तरी आता कोरोनाबरोबर जगण्याची सवय झालेली असल्याने अडचण किंवा मनावर दडपण येत नाही. मागील दोन वर्षांत पहिल्यांदाच इतका मोकळेपणा जाणवत आहे. लशीचे दोन्ही डोस झाल्यानंतर सुरक्षित वाटत असल्याने आम्ही मित्र-मैत्रिणी मांडव्याला विकएण्डचा अनुभव घेण्यासाठी आलो आहोत.
- सागरिका सिंगासने, पर्यटक, मुंबई.

***
शारीरिक, मानसिक आरोग्याकडे पाहाण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला. कोरोनाने आरोग्याकडे गांभीर्याने पाहा हे दाखवून दिलेले असल्याने मागील दोन वर्षांत नागरिकांनी आपल्या सवयीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. याचाच परिणाम त्यांचे आरोग्य सुदृढ होऊ लागले आहे. ही समाधानाची बाब आहे.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड.
***
१३ फेब्रुवारी
रुग्णसंख्येवर दृष्टिक्षेप
एकूण सक्रिय रुग्ण - ८८१
मृत्यू - ४६७९
सरासरी वाढ- ९०
.....
लसीकरणावरील दृष्टिक्षेप
पहिला डोस - २२ लाख ०५ हजार २१०
दुसरा डोस - १८ लाख ८० हजार ५८६
प्रिकॉशन डोस- २९ हजार २०७
लहान मुलांचे लसीकरण- १ लाख १८ हजार ८८६

***
१३ जानेवारी
रुग्णसंख्येवर दृष्टिक्षेप
एकूण सक्रिय रुग्ण - १३७९६
एकूण मृत्यू - ४५९८
सरासरी वाढ- २१६९
...
लसीकरणावरील दृष्टिक्षेप
पहिला डोस - २१ लाख ८१ हजार ७२२
दुसरा डोस - १६ लाख ८२ हजार ३५१
प्रिकॉशन डोस- ३ हजार ९५०
लहान मुलांचे लसीकरण- ५५ हजार ७२

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top