
ढोकशेत धरण क्षेत्रात बेकायदा भराव
पाली, ता. १५ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात एका खासगी विकसकाने बेकायदा उत्खनन आणि बांधकाम केले आहे. यामुळे धरणातील पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला. यासंदर्भात सुधागड पाली महसूल विभागाने विकसकाला दोन कोटी ३६ लाखांचा दंड ठोठावला; तर पाटबंधारे विभागानेदेखील धरणात केलेला भराव काढण्यासाठी नोटीस बजावली आहे.
धरण क्षेत्रातील अनधिकृत उत्खनन, भराव व बांधकामाविषयी सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ यांनी सुधागड महसूल विभाग व पाटबंधारे विभाग कोलाड येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई झाली. मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे, की ढोकशेत गट सर्व्हे नंबर ४३२ मध्ये शेतघर बांधण्याचे काम सुरू असून सपाटीकरणाच्या नावाखाली अनधिकृत उत्खनन करण्यात आले. ही जागा ढोकशेत धरणाला लागून असल्याने ढोकशेत धरणामध्ये अनधिकृतरीत्या भराव करण्यात आला. धरणामधून बाहेर जाणाऱ्या पाण्याचा प्रवाहदेखील मातीचा भराव करून बुजविण्यात आला. ही जागा पाटबंधारे विभागाच्या अधिकाराखाली असताना तेथे अशा प्रकारे अनधिकृत भराव होत असूनही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी करण्याची मागणी करण्यात आली होती. काही ठिकाणी वृक्षतोड झाल्याने वन विभागानेदेखील येथे लक्ष द्यावे. या अनधिकृत उत्खननासाठी महसूल विभागाने जवळपास दोन कोटी ३६ लाख रुपये दंडाची नोटीस पाठवली आहे.
....
ढोकशेत येथे एका विकसकाने महसूल विभागाची कोणतीच परवानगी न घेता अनधिकृतरीत्या उत्खनन व भरावाचे काम केले आहे. या ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केले. याबाबत सुधागड महसूल विभागाने त्यांना दोन कोटी ३६ लाख ६४ हजार ६२० रुपये दंड ठोठावला आहे.
- दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली
....
धरण क्षेत्रात अवैधरीत्या केलेला भराव काढून टाकण्याची नोटीस विकसकाला बजावली आहे. महसूल विभागाने येथे कोणतेही काम न करण्याची नोटीस बजावल्याने विकसकाला भराव काढण्यासाठी यंत्रसामग्री नेता येत नाही. त्यामुळे भराव काढण्याचे काम थांबले आहे.
- रामदास सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड
...
महसूल विभागाने दोन कोटी ६४ लाख रुपयांचा दंड करून काम बंद करण्याचे नोटीस देऊन उत्खनन सुरू आहे. तसेच ढोकशेत धरणाचा पाणी जाण्याचा मार्ग बंद करून काम सुरूच आहे. पाटबंधारे विभागाकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे.
- सागर मिसाळ, तक्रारदार
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..