
मुख्यमंत्र्यांचा फोटोवरून महाविकास आघाडीत नाराजी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ ः रोहा येथे रविवारी (ता.२७) होणाऱ्या डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो न छापल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेने हा राष्ट्रवादीचा श्रेयवाद बालीश असल्याचे म्हटले आहे. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. एका बाजूला शिवसेनेचे आमदार पालकमंत्री हटावची मागणी करीत आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या नाराजीला नजरआड करीत आपला हेतू रेटून नेत आहेत. अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभावर शिवसेनेच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता.
रोहा शहरात नावीन्यपूर्ण योजनेतून २० कोटी रुपये खर्च करून डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृह उभारण्यात येत आहे. २७ फेब्रुवारीला याचा भूमिपूजन कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो न छापल्यामुळे निधी राज्य शासनाचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व रायगडचे खासदार सुनील तटकरे विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्यासाठी शिवसेना आमदारांना डावलत असल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. रोहा येथील कार्यक्रमात शिवसेनेचा एकही नेता उपस्थित राहणार नसल्याचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री आदिती तटकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..