पांढरा कांदा ५० रुपयांनी महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांढरा कांदा ५० रुपयांनी महागला
पांढरा कांदा ५० रुपयांनी महागला

पांढरा कांदा ५० रुपयांनी महागला

sakal_logo
By

अलिबाग, ता. २८ : भौगोलिक मानांकनामुळे पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली, परंतु अवकाळी पाऊस, बदलत्या वातावरणामुळे पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यंदा फक्त कांद्याचे ५० टक्केच उत्पादन झाले. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने प्रतिकिलोला हा कांदा २० ते ४० रुपयांनी महाग झाला आहे.

अलिबाग तालुक्यातील कार्ले, पवेळे, खंडाळे आदी परिसरासह रोहा व माणगाव तालुक्यात सुमारे तीनशे हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे, परंतु अवकाळी पावसामुळे या कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यात धुक्याचाही फटका बसला. दरम्यान, करपासारख्या रोगाचा धोका निर्माण झाला होता. या शेतकऱ्यांनी या रोगांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यामुळे यंदा फक्त ५० टक्के कांद्याचे उत्पादन झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी या कालावधीत सुमारे २५ टन कांदा विक्रीसाठी रवाना करण्यात आला होता, परंतु या वर्षी फक्त १० टन पाठवण्यात आला आहे. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. लहान आकाराच्या १० किलो कांद्यासाठी ६०० रुपये; तर मोठ्या आकाराच्या कांद्यासाठी ८०० रुपये द्यावे लागत आहेत. गेल्या वर्षी हाच कांदा ४०० ते ५०० रुपयांना मिळत होता.
----
कार्ले परिसरात मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. गेल्या वर्षी चांगला फायदा झाला होता. यंदा अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादनावर ५० टक्केपेक्षा अधिक परिणाम झाला. मागणी असूनदेखील ग्राहकांना मागणीनुसार कांदा देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे.
- सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी
....

अलिबाग तालुक्यात पांढऱ्या कांद्याला प्रचंड मागणी आहे. अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. कांद्याचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवण्याचा प्रयत्न आहे.
- प्रदीप बैनाडे, अलिबाग तालुका कृषी अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top