
ताम्हिणी घाटात पशुपक्ष्यांसाठी मातीची भांडी
पाली, ता. २३ (वार्ताहर) : पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हणी घाट जैविविधतेने नटलेला आहे. उन्हाचे चटके वाढू लागल्यानंतर या परिसरातील पशू-पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण होते. ही बाब लक्षात घेऊन काही निसर्गप्रेमींनी पाण्यासाठी जागोजागी मातीची भांडी ठेवली आहेत. या भांड्यातून पाणी पिताना पशू-पक्षी दिसल्यानंतर निसर्गप्रेमी समाधान व्यक्त करतात.
शिशिर ऋतूत झाडांची पानगळती झाल्यानंतर ताम्हणी घाटातील पक्षी, प्राणी, कीटकांचा मोर्चा अन्न पाण्यासाठी घाट पायथ्याशी वसलेल्या विळे, भागाड, पाटणूस, भीरा आदी गावांमध्ये वळतात. त्यानंतर या भागातील रहिवाशांना कधी बिबट्याचे, तर कधी भेकर, चौशिंगा, मोर, लांडोर, काळगे, उदमांजर अशा प्राण्यांसह विविध पक्ष्यांचे दर्शन होते. त्यामुळे त्यांची भटकंती थांबावी आणि त्यांचे रस्त्यांवरील अपघात रोखावेत, या उद्देशाने काही पर्यावरणप्रेमींनी ताम्हणी घाटात विविध ठिकाणी मातीची भांडी सिमेंटच्या साह्यायाने अगदी व्यवस्थित बसवलेली आहेत.
पुण्याहून ताम्हणीमार्गे रायगड व कोकणात प्रवेश करणे सोपे असल्याने वर्षातील बाराही महिने कोकणात पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते. येणारे जाणारे पर्यटक या भांड्यात पाणी टाकतात आणि हे पाणी मातीच्या भांड्यात असल्याने दिवसभर थंड राहते. या भांड्यातील पाणी पिण्यासाठी दिवसभर माकडे आणि पक्षी येतात; तर रात्री विविध निशाचर वन्यजीव तहान भागवतात, असे येथील निसर्ग अभ्यासक रामेश्वर मुंढे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..