(केपी.................)
------------------
स्वतःच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करा
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे तरुणांना आवाहन
मुलुंड, ता. २२ (बातमीदार) ः संघर्ष करून स्वतःचे विश्व उभे करणाऱ्या तरुणांची आज समाजाला नितांत गरज असून येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तरुणांनी स्वतःमधील क्षमतांचा पूर्णपणे वापर केला पाहिजे, असे आवाहन नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. बृहन्मुंबई पेंशनर असोसिएशन आणि शारदा प्रकाशनाच्या वतीने कवी रघुनाथ मोहिते यांच्या ‘विरंगुळा’ आणि ‘वास्तव’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ. लहाने पुढे म्हणाले की, एखाद्या छोट्या संकटाला पाहून पळ काढणारे आणि जीवन संपवून टाकणारे तरुण पाहिले की देशाच्या भविष्याची चिंता वाढायला लागते. अशा प्रसंगी ज्येष्ठ असलेल्या अनुभवी वयोवृद्ध व्यक्तींकडून जीवनाशी टक्कर देण्याची शक्ती घेण्याची गरज आहे. आजच्या कार्यक्रमाला नव्वद वर्षांचे पेंशनर आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्यातील ऊर्जा पाहिली की कोण तरुण आणि कोण वृद्ध, असा प्रश्न पडतो. मी शासकीय सेवेतून निवृत्त झालो असलो तरी सामाजिक सेवेचे व्रत कायम सुरू राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन मोफत करणार असून हे कार्य असेच पुढे सुरू राहणार आहे.
या वेळी सुचिता पाटील, श्रीकांत कवळे आणि यामिनी पानगावकर यांना साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लेखिका प्रज्ञा पंडित यांच्या ‘इंग्रजी माझ्या खिशात’ या पुस्तकाचे डॉ. लहाने यांनी कौतुक केले. यावेळी सु. शि. साळवी, रश्मी नांदिवडेकर, विश्वास काटकर, गो. रा. आमले, श्री. आ. गवळी, सीताराम न्यायनिर्गुण, प्रकाशक संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
...
सेवानिवृतांची नेत्रशस्त्रक्रिया मी मोफत करणार असून स्वतःचे क्लिनिकही सुरू करणार आहे. नेत्र शस्त्रक्रियेचे कर्तव्य कायम पार पाडणार आहे. ज्येष्ठांना आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळाही घेणार आहे. सामाजिक कार्य करताना वय महत्त्वाचे नसून समाजाविषयी वाटणारी आत्मीयता फार मोलाची आहे. पेन्शनसंदर्भात जी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करून देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करीन.
- डॉ. तात्याराव लहाने, नेत्रतज्ज्ञ
...