Tue, March 28, 2023

नाताळ सणाला मर्यादा
नाताळ सणाला मर्यादा
Published on : 22 December 2021, 1:01 am
(केपी.................)
------------------
वसईत नाताळनिमित्त ऑनलाईन कार्यक्रमांवर भर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; चर्चमध्ये काटेकोर नियम
वसई, ता. २२ (बातमीदार) : वसई तालुक्यात नाताळ सणाला उत्सवाचे स्वरूप येते. मात्र कोरोनाने शिरकाव केल्याने गेल्या वर्षापासून सार्वजनिक सणांना मर्यादा आल्या आहेत. वसईत गेल्या वर्षी नाताळ सण साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाही कोरोना नियंत्रणात असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे यंदाही नियम पाळूनच नाताळ साजरा केला जाणार आहे. या ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रमांवर अधिक भर देण्यात आला असून, गावात काही कार्यक्रमांचे मर्यादित स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे.
डिसेंबरच्या २५ तारखेला नाताळ सण येतो. या दिवशी वसई, विरार, नालासोपारा व नायगाव भागात असणाऱ्या चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. एकमेकांना शुभेच्छा देऊन फटाक्यांची आतषबाजी व विविध कार्यक्रमाची रेलचेल आठवडाभर सुरू असते. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन घेण्यावर भर देण्यात येणार आहे. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी एका बाकावर २ व्यक्तींनाच बसण्याची परवानगी असणार आहे. त्याचबरोबर मास्क बंधनकारक केले आहे; तर भुईगाव येथील उमेद संस्थेत अपंग बांधवांसोबत नाताळ साजरा केला जाणार असल्याची माहिती भुईगाव होली फॅमिली चर्चचे फा. बाप्तिस लोपीस यांनी दिली.
हजारो वर्षांची संचित असलेली सामवेदी बोलीभाषा, संस्कृती जतन व सामाजिक एकोपा जपण्यासाठी सामवेदी ख्रिस्ती मंडळातर्फे कार्यक्रम केला जातो. मात्र यावर्षी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सामवेदी ख्रिस्ती कुपारी मंडळाचे अध्यक्ष फिलिप (जिम) रॉड्रिग्ज यांनी दिली, तर समाज विकास केंद्र चौकाळा, गोम्स आळी येथे देखील कार्यक्रमावर मर्यादा घालण्यात आली आहे. आजारी, ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन मिष्टान्न दिले जाणार असल्याचे गावकी कमिटीचे अध्यक्ष जॉकीम परेरा व सचिव लिओ रिबेलो यांनी सांगितले. कमीतकमी संख्येने उपस्थित राहून लहान मुले, महिला आदींसाठी कार्यक्रमाचे आयोजन वाघोली येथील वेलंकनी माता चर्च येथे करण्यात आले आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे फा. ज्यो. डिमेलो यांनी सांगितले.
-----------------------------------------
चौकट
सजावटीची लगबग
सार्वजनिक स्वरूपात नाताळ साजरा करताना अडचणी असल्या तरी येशूचा जन्म कसा झाला, यासह विविध जनजागृती संदेश देणारे नाताळ गोठे गावागावांत सजविण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू आहे. तसेच घरोघरी विद्युत रोषणाई, नाताळ ट्री यासह विविध वस्तू खरेदी केल्या जात आहेत. त्यानिमित्त बाजारपेठांमध्येही विविध शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या असून, ग्राहकांची सकाळ-सायंकाळी खरेदीसाठी लगबग पाहावयास मिळत आहे.
कोट
कोरोनामुळे यंदाही नाताळ सणाला मर्यादा राहणार आहेत. वसई तालुक्यातील सर्व चर्चमध्ये रात्री १२ पर्यंत प्रार्थना होणार नाही. १० पर्यंतच त्या आटोपत्या घेतल्या जातील. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे.
- फा. रिचर्ड डाबरे, बिशप हाऊस, वसई धर्मप्रांत.