वेबसिरीज – आर्या २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेबसिरीज – आर्या २
वेबसिरीज – आर्या २

वेबसिरीज – आर्या २

sakal_logo
By
(केपी.................) ------------------ वेबसिरीज – आर्या २ ( डिस्ने हॉटस्टार) वर्किंग मदरची थरारक गोष्ट अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या `आर्या’ या वेबसीरिजच्या पहिल्या सीजनला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याचा दुसरा सीजनही तितकाच दमदार बनवण्यात आला आहे. एक आई मुलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर निर्णय घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला एका वेगळ्या पठडीत नेऊन ठेवणाऱ्या वर्किंग मदरची ही गोष्ट अतिशय रंजकपणे मांडण्यात आली आहे. पतीच्या हत्येनंतर पोलिसांच्या मदतीने मुलांना घेऊन आर्या भारतात परतते. आपले वडील आणि भाऊ यांच्याविरुद्ध साक्ष दिल्यानंतर आर्या आणि मुलांना ऑस्ट्रेलियात पाठवण्याचे आश्वासन पोलिसांकडून तिला मिळालेले असते. आर्या न्यायालयात आपली साक्ष बदलते आणि तिच्या कुटुंबाला एका मागोमाग एका संकटांना तोंड द्यावे लागते. उदय शेखावत, संग्राम, रशियन माफिया, पोलिस अशा अनेकांशी लढता लढता मुलांच्या सुरक्षेसाठी ती झगडत असते. ज्या ३०० कोटींच्या अमली पदार्थांपासून आपली सुटका झाली असे ती समजत असते तोच माल पुन्हा तिच्या हातात येतो. वडिलांची सर्व संपत्तीही तिच्या नावे करण्यात येते. या सर्वांपेक्षा तिच्यासाठी महत्त्वाचे असते ते आपल्या मुलांसह सुखरूप परदेशात जाणे. आर्याने तिच्या भविष्यासाठी कितीही प्लान केले तरी नियतीला मात्र काहीतरी वेगळे मंजूर असते. शेवटी स्वतःला वर्किंग मदर म्हणून घेणारी आर्या एका वेगळ्याच रुपात समोर येते. मुलांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला एक निर्णय तिचे पूर्ण आयुष्य बदलवून टाकतो. वेबसीरिज विश्वातील सशक्त स्त्री व्यक्तीरेखांपैकी एक म्हणजे आर्या. एका स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही क्राईम थ्रिलर सीरिज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. यामध्ये अनेक पात्र आहेत, कथेत अनेक वळणे आहेत, प्रत्येक पात्राची स्वतःची एक छोटीशी का होईना एक वेगळी कथा आहे. पण या सर्वांना सहजतने बांधून ठेवण्याची किमया लेखनातून साधली गेली आहे. सीरिजची लांबी जास्त असूनही ती कुठेही कंटाळवाणी होत नाही. आर्याची मुलांना सुरक्षित ठेवण्याची तगमग प्रेक्षकांना अस्वस्थ करत राहते. सुरुवातीचे काही भाग थोडे संथ वाटले तरी शेवटी मात्र कथा वेग घेते. सतत दुसऱ्यांच्या मदतीने आपल्या मुलांच्या सुरक्षेची तजवीज करणाऱ्या आर्याला `शेरनी’ची उपमा देऊन तिच्यातल्या ताकदीला जागवण्याचे काम केले जाते. त्या प्रसंगापासून कथा अतिशय रंजक बनते. अमली पदार्थ आणि गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असली तरी आर्याचे वेगळेपण म्हणजे कथेला दिलेला इमोशनल टच. अगदी नकारात्मक व्यक्तिरेखांमधली सकारात्मकताही अतिशय छान पद्धतीने यात अधोरेखित करण्यात आली आहे. संवाद ही या सीरिजची आणखी एक दमदार बाजू. आर्याच्या भूमिकेत सुश्मिता सेन हिने अतिशय उत्तम काम केले आहे. या सीरिजमधल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. सिकंदर खेर, विकास कुमार, अंकुर भाटिया, आकाश खुराना, विश्वजीत प्रधान, गीतांजली कुलकर्णी ही त्यातली काही नावे. या अतिशय दमदार सीजननंतर तिसऱ्या सीजनचे संकेत देत आणखी एका रंजक वळणावर सीरिज संपवण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या सिजनची आवर्जून प्रतीक्षा करावी लागेल. -विशाखा टिकले-पंडित