Tue, March 21, 2023

नाला बुजवण्याचे काम त्वरीत थांबवा!
नाला बुजवण्याचे काम त्वरीत थांबवा!
Published on : 22 December 2021, 11:57 am
नाला बुजवण्याचे काम त्वरीत थांबवा!
महापेतील माजी नगरसेवक नामदेव डाऊरकर यांची मागणी
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : महापे - तुर्भे एमआयडीसी मार्गावरील इलेक्ट्रॉनिक्स झोन समोरील रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या नैसर्गिक नाल्यालगत माती व डेब्रिजचा भराव टाकून नाल्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे काम त्वरित बंद करण्याची मागणी माजी नगरसेवक नामदेव डाऊरकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका महापे गाव व आजूबाजूच्या लघु उद्योगांना बसू नये याकरिता पावसाळी नाले महत्त्वाची भूमिका बजावतात. काही ठिकाणी तर नाल्यामध्ये भराव टाकून बांधकाम करण्यात आल्याच्या घटना एमआयडीसीमध्ये घडल्या आहेत.
महापे एमआयडीसी इलेक्ट्रॉनिक्स झोन समोरील वाहतुकीच्या मुख्य रस्त्यालगत सांडपाणी आणि डोंगरदऱ्यांचे पाणी वाहून नेणारा नाला आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून या नाल्यात माती व डेब्रिज भरावा टाकला जात आहे. नाला बुजविण्याचे काम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असून, हे काम त्वरित बंद करावे, अशी तक्रार महापेतील माजी नगरसेवक नामदेव डाऊरकर यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांच्याकडे केली. याची दखल घेत आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे डाऊरकर यांनी सांगितले.
कोट
उद्यानाकरिता नाल्यात भराव का टाकला जातो आहे. उद्यानासाठी आमचा विरोध नाही. परंतु, नाल्यात भराव न टाकता नाल्याच्या बाजूला मोकळ्या जागेत उद्यान तयार करावे. अन्यथा नाला बचावासाठी मोहीम हाती घेतली जाईल.
नामदेव डाऊरकर,माजी नगरसेवक
कोट
महापे येथील एका कंपनीला झाडे व उद्यान उभारणीकरिता एमआयडीसीने २ हजार ४०० चौ. मीटरचा भूखंड वितरित केला.
- सतीश बागल, प्रादेशिक अधिकारी, महापे एमआयडीसी