पार्कींगवरुन अधिकारी आणि कंत्राटदारांची चंगळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्कींगवरुन अधिकारी आणि कंत्राटदारांची चंगळ
पार्कींगवरुन अधिकारी आणि कंत्राटदारांची चंगळ

पार्कींगवरुन अधिकारी आणि कंत्राटदारांची चंगळ

sakal_logo
By
वाहनतळावर प्रवाशांची लुट करार संपुष्‍टात तरी वसुली सुरूच; सिडकोतर्फे पोलिसांत तक्रार सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. २२ : सिडकोतर्फे चालवण्यासाठी दिलेल्या रेल्वे स्थानकांवरील पे ॲण्ड पार्कचा करारनामा संपुष्टात आल्यानंतर सिडकोचे अधिकारी आणि कंत्राटदारांकडून वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून खारघर लिटील वर्ल्ड मॉल समोरील पार्कींग, खारघर रेल्वे स्थानक, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल अशा पाच पार्किंगचा करार संपल्यानंतरही राजरोसपणे प्रवाशांची लुट सुरू आहे. या प्रकरणी सिडकोतर्फे पोलिसांत गुन्हे दाखल करून कारवाईचा दिखावाही केला जात आहे. रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यानच्या रेल्वे स्थानकांचा सिडकोतर्फे विकास करण्यात आला आहे. या मार्गावर भव्य रेल्वेस्थानके उभारल्यानंतर त्याचा खर्च चालवण्यासाठी सिडकोने कंत्राटदार नेमले आहे. या कंत्राटदारांवर रेल्वे स्थानकांच्या आवारातील फूड कोर्ट परिसर, शेजारच्या पार्किंगच्या जागांची देखभाल दुरुस्तीकरिता करार केला आहे. त्यानुसार सिडकोतर्फे लिटल वर्ल्ड मॉल खारघर येथील पार्किंगकरिता व्ही.सी पाटील एन्टरप्रायझेस यांना डिसेंबर २०१९ पर्यंत ठेका देण्यात आला होता. हा ठेका संपून दोन वर्षे उलटली आहेत. तरी सुद्धा कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडून लिटल वर्ल्ड समोरील जागेत वाहने उभी करणाऱ्या लोकांकडून दादागिरी करून पैसे वसूल केले जात आहेत. खारघर रेल्वे स्थानकावरील पार्किंगचा ठेका रंजना एन्टरप्रायझेस यांना मार्च २०२१ पर्यंतच्या मुदतीवर देण्यात आला आहे. परंतु त्यापुढे करारनामा केल्याचे स्पष्टीकरण सिडकोने माहिती अधिकार कार्यकर्ते अभिनय येलवे यांना देण्यात आलेला नाही. मानसरोवर रेल्‍वे स्‍थानकातील पार्किंगचा ठेका जयमल्हार एन्टरप्रायझेस यांना जुलै २०१८ ते जुलै २०२१ पर्यंत देण्यात आला होता. परंतु त्यानंतर करारनामा न झाल्याचे समजते. त्यानंतरही या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून सर्रासपणे पार्किंगचे पैसे वसूल केले जात आहेत. खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगचे ठेका शक्ती कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. मे २०२० मध्ये त्याची मुदत संपली आहे. तरी सुद्धा वसुली बिनधिक्कत सुरू आहे. पनवेल रेल्वे स्थानकाचे पार्किंग ठेका व्ही.सी. पाटील एन्टरप्रायझेस यांना देण्यात आले आहे. मार्च २०१८ ते मार्च २०२१ पर्यंत त्याची मुदतवाढ आहे. परंतु त्यानंतरचे करार करण्यात आल्याचे कागदपत्र सिडकोने उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. या वाहनतळावर दिवसाला सात हजार चारचाकी व दुचाकी वाहने उभी असतात. परंतु तरी या वाहनतळांवर रोज वाहन मालकांकडून पार्किंगचे पैसे घेतले जात आहेत. ----------------------------- सिडकोकडून कामोठे पोलिसांकडे तक्रार मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या आवारात वाहने उभी केल्यावर पैसे वसूल करणाऱ्या अज्ञात लोकांविरोधात सिडकोने तक्रार दिली आहे. येथील पार्किंगच्या जागेत सद्या सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेची घरे उभारण्याचे काम शापूरची पालोनजी ॲण्ड कंपनीला देण्यात आले आहेत. त्यामुळे पार्किंग बंद करण्यात आली आहे. तरी सुद्धा वसुली सुरू असल्याने चौकशी करण्याची मागणी सिडकोने केली आहे. ----------------------------- सिडकोतर्फे चालवण्यासाठी देण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांवरील पार्किंगचे ठेके संपल्यानंतरही अनेक वर्षे वसुली होत आहे. या वसुलीतील काही भाग २०१९ पासून २०२० पर्यंत पार्किंगचे काम पाहणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे समजते आहे. वसूल केल्या जाणाऱ्या मलईतून काही भाग संबंधित अधिकारी, स्थानिक पोलिस ठाण्याला दिला जात असल्याची चर्चा सिडकोत रंगली आहे. दिवसाढवळ्या प्रवाशांची लुट सुरू असताना सिडकोतील दक्षता विभाग निद्रावस्थेत कसे, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.