Mon, March 27, 2023

फ्लेमिंगो पक्ष्यांवर पुन्हा फटाक्यांनी हल्ला
फ्लेमिंगो पक्ष्यांवर पुन्हा फटाक्यांनी हल्ला
Published on : 22 December 2021, 1:23 am
(केपी.................)
------------------
फ्लेमिंगो पक्ष्यांवर पुन्हा फटाक्यांनी हल्ला
पक्षी निरीक्षकांना पाणथळ जागेवर सापडले फटाके
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : नवी मुंबईच्या खाडीकिनारी लाखो मैल प्रवास करून येणाऱ्या फ्लेमिंगोसारख्या प्रवाशी पक्ष्यांना मारण्याकरीता पुन्हा एकदा काही अज्ञात व्यक्तींकडून प्रयत्न झाला आहे. उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ क्षेत्रात फ्लेमिंगो पक्ष्यांना मारण्यासाठी चक्क दिवाळीतील फटाक्यांचा वापर करण्यात आला आहे. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या काही स्थानिक आणि पक्षी निरीक्षकांना न जळालेले फटाके सापडले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच बॉम्बे हाईकोर्ट नियुक्त कांदळवन संरक्षण आणि संवर्धन समितीकडे दाखल करण्यात आलेल्या ताज्या तक्रारीत पाणजे क्षेत्रात फटाके लावण्याच्या प्रकाराचा पुरावा नेटकनेक्ट फाऊंडेशन या पर्यावरणवादी संस्थेने दिले आहेत. फटाके लावण्यात आल्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ पाठवताना नेटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी हा प्रसंग अतिशय गंभीर असल्याची माहिती दिली. पाणजे क्षेत्रात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असल्याचे कुमार यांनी सांगितले. यापूर्वी गळ्यात ओळखपत्र घालून काही अज्ञात व्यक्तींनी दिवसाढवळ्या पाणथळ जागेत फटाके लावून पक्ष्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले होते. कुमार यांनी चालू माहिती मिळवण्यासाठी सरकारकडे आरटीआय अर्ज सादर केला होता. याबाबत शहर विकास विभागाने ताजी माहिती देताना संबंधित प्रकरण शहर नियोजन एजन्सी सिडकोकडे वर्ग करण्यात आल्याचे कळवले. या प्रकरणी पोलिस कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती ही त्यांना देण्यात आली. "मात्र कोणत्याही स्वरूपाची कारवाई झाल्याचे ऐकिवात आले नाही आणि आता वारंवार असे प्रसंग घडत आहेत, असेही कुमार यांनी सांगितले.
--------------------------------
सिडको, सरकारच्या मालकीची असून पर्यावरण बचावाकरिता बांधील आहे. त्यांच्याकडून पाणथळ क्षेत्र नवी मुंबई एसईझेडकडे वर्ग करण्यात आले. विकास आराखड्यानुसार, सेक्टर १६ ते २८, संपूर्ण पाणथळ क्षेत्र हे आगामी द्रोणगिरी नोडकरिता राखून ठेवण्यात आल्याने सिडकोने लक्ष देण्याची गरज आहे.
- बी. एन. कुमार, नेटकनेक्ट फाऊंडेशन, संस्थापक.